संपूर्ण भारतात सध्या गणेश उत्सवाचे वातावरण आहे. भक्त गणपतीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. सिनेकलाकारही आपल्या भक्तीचे प्रदर्शन करण्यात मागे नाहीत. ते देखील सोशल मीडियाच्या मदतीने गणेश उत्सवात उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री सारा अली खान हिने देखील गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेतानाचा एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला.
या फोटोला अल्पावधीच लोकप्रियता मिळाली. साराच्या चाहत्यांनी या फोटोचे प्रचंड कौतूक केले. परंतु त्याच दरम्यान तिचे हे भक्ती प्रदर्शन काही कट्टरपंथीयांना रुचलेले नाही. त्यांनी सारावर धार्मिक टीका करत तिच्या या पोस्टला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान व त्याची घटस्फोटीत पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. मुस्लीम असून देखील केवळ प्रसिद्धीसाठी ती गणेश भक्तीचा आव आणत असल्याचा आरोप ट्रोलर्सनी केला आहे. तिने हिंदू व मुस्लीम यांपैकी एक धर्म निवडून तो जाहिर करावा त्यानंतरच गणेश मुर्तीला स्पर्श करावा, अशा शब्दात साराला ट्रोल करण्यात येत आहे. परंतु या ट्रोलींगवर साराने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 12:32 pm