बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर, ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या चर्चा सतत रंगलेल्या असतात. मात्र काही कलाकारांमध्ये ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतरही मैत्रीचे नाते कायम असल्याचे पाहायला मिळते. सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग या कलाकारांपैकी एक आहेत. सैफ आणि अमृता यांचा २००४ साली घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर १० वर्षानंतर, २०१४ मध्ये सैफने करिनाशी लग्न केले. मात्र करिना आणि सैफच्या लग्नावर अमृताची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक होते. नुकताच सारा अली खानने सैफ आणि करिनाच्या लग्नाची बातमी ऐकताच तिची आई अमृताची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा केला आहे.

नुकताच साराने हॅलो मॅगझीनसाठी फोटो शूट केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. फोटोशूटनंतर साराने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या कुटुंबाशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान तिने तिची आई अमृताची सैफ आणि करिनाच्या लग्नाची बातमी ऐकून काय प्रतिक्रिया होती याचा देखील खुलासा केला. ‘जेव्हा माझे वडिल सैफ अली खान करिनासोबत लग्न करत आहेत हे आईला कळाले तेव्हा ती लॉकर जवळ गेली आणि लॉकरमधून दागिने काढू लागली होती मला अजूनही लक्षात आहे. माझ्या आईला ते ऐकून आनंद झाला होता. तेव्हा मी आईला मला कोणते झुमके चांगले दिसतील हे देखील विचारले होते’ असे सारा म्हणाली.

‘माझ्या आईने ड्रेस डिझायनर संदीप आणि अबु यांना घरी बोलवले होते. त्यांना सांगितले की सैफ लग्न करतोय आणि त्याच्या लग्नामध्ये साराने सर्वात सुंदर ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे’ असे अमृता म्हणाली असल्याचे साराने पुढे सांगितले. सैफच्या लग्नासाठी अमृतादेखील फार उत्साही असल्याचा खुलासा साराने केला.