सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अवघ्या दोन चित्रपटांमध्ये तिने स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला. सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत आहे. साराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. त्यातही तिचं आणि करीना कपूरचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. साराने नुकतंच एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केलं. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत करीनाविषयीच्या नात्यावर सारा व्यक्त झाली.

‘फेमिना’ या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी साराला मिळाली. मुलाखतीत करीनाविषयी सारा म्हणाली, ”करीना माझी मैत्रीण आहे पण त्याहीपेक्षा अधिक ती माझ्या वडिलांची पत्नी आहे. मी तिचा आदर करते आणि मुख्य म्हणजे ती माझ्या वडिलांना खूश ठेवते. आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत असल्याने अनेकदा गप्पांमध्ये अभिनय, चित्रपट हे विषय ओघाने येतात.”

आणखी वाचा : ..म्हणून ऋषी कपूर यांना न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये समजलं होतं वेटर 

करीनासोबत वावरताना मला कधीही संकोचलेपणा वाटला नाही असं साराने करिअरच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. ”करीना माझी सावत्र आई आहे हे मला वडिलांनीच सांगितलं होतं. पण करीनाला माझी चांगली मैत्रीण व्हायचं आहे, तिनं हे फार पूर्वीच मला सांगितलं होतं. ती सावत्र आई असली तरी मी तिला छोटी माँ म्हणून कधीही हाक मारणार नाही, तिला ते अजिबातच आवडणार नाही,” असंही सारा गंमतीनं म्हणाली होती.

करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. सारासोबत चांगली मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करीनाने नेहमीच केला आहे. त्यामुळे सारासुद्धा करीना आणि तैमुरसोबत आनंदाने वावरताना दिसते.