‘सपना बाबूल का बिदाई’ या मालिकेत साधनाची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सारा खान तिच्या ओठांच्या सर्जरीमुळे चर्चेत आली. सोशल मीडियावर साराच्या नव्या लूकचे फोटो व्हायरल झाले आणि अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल केलं. ‘लिप फिलरचा प्रयोग करणं मूर्खपणाचं ठरलं’, असं म्हणत साराने पश्चात्ताप व्यक्त केला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सारा ‘लिप फिलर’च्या प्रयोगाबद्दल व्यक्त झाली. “मला आयुष्यभर ‘बिदाई’मधील साधीसुधी साधना बनून राहायचं नव्हतं. सारा खान म्हणून मला माझी ओळख हवी होती. माझ्या भूमिकेप्रमाणेच लोक माझ्या नव्या लूकलाही पसंत करतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे मी लिप फिलरचा प्रयोग स्वत:वर करताना फारसा विचार केला नाही. पण तो निर्णय चुकीचा ठरला आणि मलासुद्धा माझं नवीन लूक अजिबात आवडलं नाही. ते माझ्या चेहऱ्यावर इतकं वाईट दिसत होतं की मला स्वत:ला आरशात बघायची इच्छा राहिली नव्हती”, असं ती म्हणाली.

आणखी वाचा : लोकांना आता तुला व्हिलन म्हणून पाहायचं नाहीये; यावर सोनू सुद म्हणतो….

कलाविश्वातील अनेक अभिनेत्री आकर्षक दिसण्यासाठी ‘लिप फिलर’चा पर्याय निवडतात. ओठांच्या सर्जरीपेक्षा हे कमी खर्चिक आणि काही वेळापुरतं टिकणारं असतं. लिप फिलरमुळे ओठांच्या आकारात बदल होतो आणि नेहमीपेक्षा ते थोडे जाड दिसू लागतात. मात्र हा बदल ठराविक कालावधीपुरता असतो. त्यानंतर ओठांचा मूळ आकार परत येतो.