काही कलाकार हे कलाविश्वासोबतच इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय असतात. तर काही इतर क्षेत्रांमध्ये योगदान देण्यासाठी चक्क कलेचाही त्याग करतात. अभिनेता राजेश कुमारसुद्धा सध्या याच मार्गावर चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आपल्या खेडेगावाला स्मार्ट खेडेगाव करण्यासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या राजेशने अभिनय क्षेत्रातून काही काळ काढता पाय घेतला आहे.

राजेश कुमार म्हटल्यावर काही लक्षात येतंय का? नाही…. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील रोसेश आठवतोय? अगदी बरोबर, रोसेशची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता राजेश कुमार सध्या एका वेगळ्याच कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देतोय.

अभिनय विश्वाकडे पाठ फिरवून त्याने बिहारमधील बर्मा गावाला स्मार्ट बनवण्याच्या हेतूने काही महत्तावाची पावलं उचलली आहेत. या गावात शेतीच्या अुशंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासोबतच जैविक शेती करण्यासाठी त्याने बर्मावासियांना प्रोत्साहित केलं आहे. आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून राजेशने हा निर्णय घेतला असून या खेडेगावात वीज उपलब्ध करुन देण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

‘मुंबई मिरर’शी संवाद साधताना राजेशने याविषयीची अधिक माहिती दिली. मी गेल्या वर्षी या गावाा भेट दिली. एका पडिक जमीनीला माझ्या वडिलांनी उपजाऊ जमीन करत त्यावर भाजीपाल्याचं पीक घेण्यास सुरुवात केली होती, यावर माझ्या विश्वासच बसेना. हे सर्व त्यांनी पाच वर्षांच्या कावालधीत साध्य केलं होतं. ज्यादरम्यान त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी प्रमाणात केला होता. जैविक शेतीविषयी वाचून त्या दृष्टीनेच काही महत्त्वाची पावलं उचलत राजेशच्या वडिलांनी ही किमया केली, ज्याचा त्याच्यावरही फार प्रभाव पडला आणि त्याने गावाकडेच जाण्याचा निर्णय घेतला. सध्या राजेश गावातील लोकांसोबतच काम करतो, त्यांच्यातच त्याची उठबस असते. या साऱ्यात त्याला शहरी राहणीमानाची पुसटशी आठवणही येत नाही. मुख्य म्हणजे इथे आल्यावर आपल्याला अंतर्मनाची साद ऐकू येते, असंही राजेशचं म्हणणं आहे. देशातील शहरी भागात राहणारे जास्तीत जास्त लोक खेड्याकडे गेले, शेती केली तर भारताच्या कृषीउत्पन्नावर त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल, असंही राजेशचं मत आहे.