झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेली आर्या आंबेकर आता लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात समोर येणार आहे. गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आर्या आता अभिनयातही नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. मूळची नागपूरची असलेली आर्या ‘रंगीला रे’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.
आर्या जरी गायनात हुषार असली तरी भविष्यात ती अभिनेत्री होणार याची चुणूक ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्येच पाहायला मिळाली होती. आता ‘रंगीला रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते सत्यात अवतीर्ण होणार आहे. ‘रंगीला रे’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाबाबत आर्या खूप उत्साहित आहे. याबाबत ती म्हणते की, बालपणापासून मी संगीतावर लक्ष केंद्रित करून त्यात यशस्वी झाले आहे. आता ‘रंगीला रे’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीच्या रूपात समोर येताना कोणतीही उणीव राहू नये याकडे बारकाईने लक्ष देत आहे. यापूर्वीही चित्रपटांमध्ये काम करण्याच्या बऱयाचशा संधी आल्या होत्या परंतु अभिनयात पदार्पण करण्यासाठी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. उत्तम कथानक असलेल्या ‘रंगीला रे’ रूपाने मला दमदार भूमिका मिळाली असून या चित्रपपटाबाबत मी खूप उत्सुक आहे. प्रथमच कॅमेरा फेस करणार असले तरी आत्मविश्वास ठासून भरलेला असल्याने इथेही यशस्वी होईन याची खात्री असल्याचे आर्याने सांगितले.
‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्ये बहारदार परफॉर्मंसद्वारे आर्याने हरीहरन, महालक्ष्मी अय्यर, श्रेया घोषाल यांसारख्या भारतीय संगीत विश्वात मानाचं स्थान असणाऱया दिग्गजांना मंत्रमुग्ध केलं होतं. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आर्याने गायलेल्या लता मंगेशकर यांच्या “ऐ मेरे वतन के लोगों…” गाण्याने शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. ‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.  सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे.