सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. दरम्यान सरोज खान यांचा अभिनेत्री माधुरी दिक्षितसोबत डान्स करतानाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘एक दो तीन’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत.

माधुरीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. माधुरी सरोज खान यांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. गेल्या वर्षी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी माधुरी त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी दोघांनी ‘एक दो तीन’ या गाण्यावर डान्स केला होता. माधुरीच्या करिअरमधील हे सुपरहिट गाणं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. आज त्यांची आठवण म्हणून हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून सरोज खान बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं.