सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं ३ जुलै रोजी पहाटे निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सरोज खान यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. सरोज खान यांची मुलगी सुकैनाने याबाबत एका वेबसाइटला माहिती दिली. सरोज खान यांच्या बायोपिकसाठी काही जणांनी रस दाखवला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला होता. कोरिओग्राफ आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाने त्यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणावा अशी सरोज खान यांची इच्छा होती.

‘कलंक’ या चित्रपटातील ‘तबाह हो गए’ या गाण्यासाठी त्यांनी शेवटची कोरिओग्राफी केली होती. यावेळी त्यांनी रेमोसोबत काम केलं होतं. रेमोनेही त्यांच्या बायोपिकवर काम करण्याबाबत सांगितलं होतं. मात्र काही कारणास्तव बायोपिकची चर्चा पुढे होऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा रेमो डिसूझा हा सरोज खान यांच्या बायोपिकवर काम करू इच्छित आहे. यासाठी तो लवकरच सरोज यांची मुलगी सुकैनाशी संपर्क साधणार असल्याचं कळतंय.

सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.