लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार याबद्दल लोकांना उत्सुकता असतेच, पण कलाकारही त्या संधीची वाट पाहात असतात. या संग्रहालयात आता भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि ‘बाहुबली’ या चित्रपटातील ‘कटप्पा’च्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सत्यराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सत्यराज यांचा मुलगा सिबिराजने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. सत्यराज हे पहिले तमिळ अभिनेते आहेत, ज्यांचा पुतळा मादाम तुसाँमध्ये उभारण्यात येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सत्यराज यांचे तमिळ चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. जवळपास तीन दशकांपासून ते या इंडस्ट्रीत आहेत, पण ‘कटप्पा’च्या भूमिकेने ते घराघरांत पोहोचले. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची दाद मिळवली.

October Movie Trailer: अव्यक्त प्रेमाचा अनुभव म्हणजे ‘ऑक्टोबर’

‘बाहुबली: द बिगनिंग’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला आणि देशभरातील जनतेला एका प्रश्नात गुंतवून गेला. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले,’ या प्रश्नाने अनेकांनाच भंडावून सोडले होते. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही बॉक्स ऑफीसवर प्रचंड कमाई केली. त्यातूनच ‘कटप्पा’ची भूमिका लोकप्रिय झाली. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासचाही पुतळा मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला होता.