प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूब अनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या घरात सध्या हा भातुकलीचा खेळ रंगला आहे. क्वारंटाइन वेळेत सतीश राजवाडे हे मुलीसोबत भातुकलीचा खेळ खेळण्यात रमले आहेत.

करोना विषाणूचा अधिकाधिक प्रसार होऊ नये यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. या लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोडता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे घरीच असलेले हे कलाकार कधी चित्रकला, कधी साफसफाई तर कधी मुलांसोबत वेळ घालवत आहेत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सोशल मीडियावर नुकताच हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

करोना विषाणूच्या दहशतीमुळे सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच कलाकार घरी बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात आहेत. घरी बसून ते काय करत आहेत, क्वारंटाइन वेळ कसा घालवत आहेत हे सोशल मीडियाद्वारे ते सांगत आहेत.