News Flash

‘ती सध्या काय करते’ची जोरात कमाई

‘सैराट’नंतर थंड असणाऱ्या तिकीटबारीला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटामुळे चैतन्य आले.

ती सध्या काय करते

संपूर्ण वर्षभरात पूर्ण नियोजन करून, झोकून देऊन एकच परफेक्ट चित्रपट करायचा सुपरस्टार आमिर खानचा फंडा नेहमीप्रमाणे याही वर्षी यशस्वी ठरला आहे. शंभर-दोनशे कोटींची गणिते मागे टाकून बॉलीवूडपटांची कमाई ३०० कोटींच्या पुढे नेण्याचे श्रेय आमिर खानच्याच नावावर जमा आहे. आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ने त्याहीपुढे जात ३५० कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम केला आहे. तर मराठीतही ‘सैराट’नंतर थंड असणाऱ्या तिकीटबारीला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटामुळे चैतन्य आले आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत साडेपाच कोटी रुपयांची कमाई केली आहे.

निश्चलनीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना चांगलाच फटका बसला होता. अनेक मराठी चित्रपट पुढे ढकलण्यात आले. मराठीत ‘सैराट’नंतर तिकीटबारीवर तेवढे चैतन्य दिसले नव्हते. राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र लगेचच निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर झाल्याने त्याचा परिणाम चित्रपटाच्या आर्थिक यशावरही झाला होता. नव्या वर्षांची सुरुवात करून देणाऱ्या सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत झालेल्या कमाईचा आकडा मात्र तिकीटबारीवरची मरगळ घालवणारा ठरला आहे. गेल्या वर्षी ‘नटसम्राट’ या चित्रपटाने तीन दिवसांत सहा कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘ती सध्या काय करते’ने ही आकडेवारी ओलांडली नसली तरी त्याच वेगाने चित्रपटाची घोडदौड सुरू असल्याचे ‘झी स्टुडिओज’च्या सूत्रांनी सांगितले.

‘पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट’ असे घोषवाक्य घेऊन आलेला ‘ती सध्या काय करते’ हा झी स्टुडिओजचा नवा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनातील नवी प्रेमकथा, अंकुश चौधरीचा नवा लुक, अंकुश आणि तेजश्री प्रधान अशी नवी फ्रेश जोडी, मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि जिला आजवर गायिका म्हणून पाहत आलो आहोत त्या आर्या आंबेकरचा चित्रपट प्रवेश अशा वेगवेगळ्या गोष्टींची एक हळूवार, संगीतमय भट्टी जमवून आलेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी या वर्षांची यशस्वी सुरूवात करून देणारा ठरला आहे.

ऐंशीच्या दशकात ‘मैने प्यार किया’ पाहून सुमन आणि प्रेमची फ्रेंडशीप, त्यातून फुलत गेलेलं त्यांचं प्रेम पाहून आपलंही असंच जिवाभावाचं कोणीतरी असावं या भावनेने भारून गेलेली तरुण मनं जशी होती तसंच प्रेम म्हणजे काय हे धड आकळायचं वय नसलेल्या शाळकरी मुलांवरही सलमानच्या ‘प्रेम’ची आणि साध्याभोळ्या सुमनची भारी छाप पडली होती. फक्त पहिल्याच नजरेत जिला पाहून आपली विकेट पडली तिच्या मागे मागे फिरणारं आपलं जग म्हणजे पहिलं प्रेमच होतं हे स्पष्टपणे समजण्याची आणि त्यातली गंमत उलगडून सांगण्याची बुद्धी मोठय़ा अन्यामध्ये आली आहे. आणि हेच पहिलं प्रेम पुन्हा आयुष्यात आल्यानंतर पुन्हा एकदा तिला लपूनछपून बघणारा अन्या तो मीच.. याची कबुली देणाऱ्या दोन पिढय़ांना सहजगत्या एकाच प्रेमकथेत पकडून ठेवणारा हा पहिल्या प्रेमाचा दुसरा सच्चा पार्ट कमालीचा हिट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:35 am

Web Title: satish rajwades ti sadhya kay karte movies three days box office collection 5 30 crore
Next Stories
1 मोठ्या मालकांनी घातला पोहे बनविण्याचा घाट
2 नवे चित्रपट मनाला न भिडणारे – डॉ. जब्बार पटेल
3 ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये सांगीतिक मेजवानी
Just Now!
X