करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. बॉलिवूड अभिनेते सतीश शाह यांना देखील करोनाची लागण झाली होती. २० जुलैला उपचारासाठी ते लिलावती रुग्णालयात भरती झाले होते. आनंदाची बाब म्हणजे सात दिवसांत त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. परिणामी २८ जुलैला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

सतीश शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आजारी असताना आलेला अनुभव सांगितला. “मला काही दिवस वारंवार ताप येत होता. माझ्या शरीराचं तापमान ९९ ते १०० डिग्रीच्या आसपास असायचं. अशा स्थितीत मी काही औषधं घेऊन बरा होण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माझा ताप काही केल्या जात नव्हता. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी करोना चाचणी केली. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर लगेचच २० तारखेला मी रुग्णालयात भरती झालो. तिथे माझ्यावर योग्य उपचार केले गेले. परिणामी आठच दिवसात मी बरा झालो. आता मी घरी परतलेलो असलो तरी देखील डॉक्टरांनी मला काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे.” असा अनुभव सतीत शाह यांनी सांगितला.

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.