मराठी चित्रपटसृष्टीत गंभीर, विनोदी, खलनायक अशा विविध भूमिका लिलया साकारणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. ‘दुनियादारी’, ‘पोश्टर गर्ल’, ‘शाळा’, ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटांतून आपल्याला त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. पण, आता हा मराठी कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीची वाट धरतोय की काय? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असेल. त्यामागचे कारणही तसेच आहे.
झालंय असं की, जितूने त्याच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. सध्या त्याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होतेय. यामागचं कारणही तसंच आहे. जितेंद्रने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे. त्याच्या या पोस्टला अभिनेत्री सई ताम्हणकरपासून अनेकांनी लाइक केले आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दोन आघाडीचे कलाकार कोणत्या कारणामुळे एकत्र आले आहेत, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. हे दोघे एकत्र का आले यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. कदाचित इतर काही मराठी कलाकारांप्रमाणे जितूही आता बॉलिवूडची वाट धरतोय की काय? असंही अनेकांच्या मनात आलं असेल. पण तसं नाहीये. तर एका चांगल्या सामाजिक उपक्रमासाठी आमिरची आणि त्याची भेट झाल्याचे कळते.
“तुफान आलंया”
लवकरंच pic.twitter.com/0O12ehhb46— jitendra joshi (@jitendrajoshi27) March 31, 2017
आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी सध्या जितेंद्र काम करत असल्याचे कळतेय. जितेंद्रने आमिरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला ‘तुफान आलंया…. लवकरच’ असे कॅप्शनही दिले आहे. पानी फाऊंडेशनच्या जाहिरातीसाठीच बहुधा हे दोघे एकत्र आले असावेत असे दिसते. काही दिवसांपूर्वीच आमिर आणि त्याची पत्नी किरण राव ‘पाणी फाउंडेशन’च्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात गेले होते.
महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. त्याच्या या उपक्रमात आतापर्यंत सुनील बर्वे, सई ताम्हणकर, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, अजय-अतुल यांनीही हातभार लावला आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये ‘पाणी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि आमिरने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होतं. या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पाणी फाउंडेशन’ ३० तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.
Read @jitendrajoshi27's immensely emotional appeal to participants of Water Cup 2017 at https://t.co/qDLArhrHYD and https://t.co/MnZ1EBJWXE pic.twitter.com/c0dtsbpTER
— Satyamev Jayate (@satyamevjayate) March 31, 2017
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 9:00 am