आर्थिकदृष्टय़ाही कमालीची भरारी घेतली असल्याने आज जगभरातील विद्यार्थी सिनेमाकडे करिअरची एक नवीन संधी म्हणून पाहात आहेत, मात्र सौदी अरेबिया हा देश गेली कित्येक वर्ष या सर्जनशील उद्योगापासून चार हात लांबच होता. ‘द इमोजी मूव्ही’ या चित्रपटाने सौदी अरेबियातला ३५ वर्षांचा मनोरंजनाचा दुष्काळ संपवून क्रांती घडवली आहे. ज्याप्रमाणे भारतात जातीव्यवस्था आणि धार्मिक कलह आहेत, पाश्चिमात्य देशांत वर्णद्वेष ही गंभीर समस्या आहे. त्याचप्रमाणे सौदीसारख्या काही देशांत नागरिकांवर लादलेली धार्मिक आणि सांस्कृतिक बंधने आहेत. त्यातच जगभरात फोफावलेल्या दहशतवादाची जन्मभूमी म्हणुन सौदीची ओळख आहे. परिणामी अंधश्रद्धा आणि धार्मिक कर्मकांडांच्या अतिप्रभावाखाली तेथील सामान्य नागरिक शिक्षण, साहित्य आणि मनोरंजन माध्यमापासून गेले अनेक वर्ष वंचित होता.

१९८२ नंतर त्या देशात एकही चित्रपट तयार झालेला नाही. मात्र इतक्या वर्षांनंतर ‘द इमोजी’हा चित्रपट तिथे प्रदर्शित करण्यात निर्माता-दिग्दर्शकांना यश आले आहे. ‘द इमोजी’ हा ८६ मिनिटांचा एक कार्टूनपट असून त्याचे दिग्दर्शन टोनी लिओन्डीस यांनी केले आहे. २८ जुलै २०१७ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा कार्टूनपट १३ जानेवारीला अनेक निर्बंध झुगारून सौदी अरेबियात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाश्चिमात्य असला तरी गेल्या ३५ वर्षांत सौदीमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला सिनेमा असल्याने सौदी अरेबियन सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे जगभरातून कौतुक होत आहे.

दिग्दर्शक टोनी लिओन्डीस यांच्या मते आजवर सौदीची तेलाच्या विहिरींचा देश म्हणून ख्याती होती. परंतु यापुढे कला, ज्ञान, क्रीडा या तिन्ही क्षेत्रांत येथील नागरिक प्रगती करताना दिसतील. ‘द इमोजी’ हा कार्टूनपट जरी असला तरी प्रदर्शनादरम्यान त्यांना अनेक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला होता. परंतु अमेरिका व सौदी या दोन्ही देशांच्या सरकारांनी दाखवलेल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला. आणि यापुढे देखील असे चित्रपट प्रदर्शित होतील अशी अपेक्षा त्यांना आहे.