स्वप्ना वाघमारे -जोशी दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असून या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिली आहे.

‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची निर्मिती जॅान अब्राहमने केली असून तो या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसून येतंय. याच उत्सुकतेपोटी त्याने त्याच्या ट्विटर हँण्डलवरुन चित्रपटाच्या ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं.

‘सविता दामोदर परांजपे’च्या माध्यमातून जॉन प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे यशस्वी मॅाडेल ते धडाकेबाज अभिनेता असा यशस्वीपणे प्रवास करणाऱ्या जॅानला आता मराठीचे वेध लागले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच त्याच्याबरोबर तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट हे कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत चित्रपटाला लाभले आहे.