गानकोकिळा लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे ‘लताशा’. हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून गायिका सावनी करत आहे. या कार्यक्रमातून अमिट गोडीची मराठी गीते कानसेनांना ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे मराठी रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सावनी आता हा कार्यक्रम हिंदीमध्येही घेऊन येणार आहे.

सावनी आणि मंगेशकर कुटुंबियांचा घरोब्याचा संबंध असून सावनीने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे लतादीदी आणि आशा भोसले यांची गाणी आणि त्यांचे बोल सतत सावनीच्या कानावर पडले आहेत. याचकारणास्तव त्याच्या गाण्यातील काही अंशी गोडवा सावनीकडेही आला आहे. हाच गोडवा लताशामध्ये पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकरही असतात, त्यामुळे हा कार्यक्रममध्ये श्रोत्यांसाठी पर्वणीच असते. हीच गायनाची पर्वणी हिंदीमध्येही श्रोत्यांना मिळावी, यासाठी हा कार्यक्रम लवकरच हिंदीमध्ये सुरु होणार आहे.

“गेली पाच वर्ष लताशा मराठीत करताना, अनेकजण मला लतादीदी आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करावा, अशी मागणी करत होते. या मागणीनंतर मी बाबांच्या (पंडित हृदयनाथ मंगेशकर) परवानगीने आणि त्यांच्या आशिर्वादाने हिंदी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आणि पहिले दोन कार्यक्रम पुण्यात केले. तिथल्या श्रोत्यांच्या प्रतिसादानंतर मुंबईतल्या रसिकांसमोर कार्यक्रम सादर करायचा आत्मविश्वास आला. त्यातूनच मग आता २६ एप्रिलला दिनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम आम्ही करत आहोत”, असं सावनीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “२० वादकांच्या संचासह हा कार्यक्रम मी करत आहे. या कार्यक्रमातून दीदी आणि ताईंनी भक्तीगीतांपासून अगदी कॅब्रेपर्यंत गायलेली गाणी आणि त्यांचे किस्से तुम्हांला ऐकायला मिळतील”.