15 November 2019

News Flash

‘ग्रामीण भाषेला लोकांची पसंती’

चित्रपटांमधून ग्रामीण भाषा, तेथील कथानक यांना जास्त पसंती मिळत असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधून आपला ठसा उमटवणारे अभिनेता सयाजी शिंदे आगामी बाबो चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. रमेश चौधरी दिग्दर्शित बाबो या चित्रपटात मराठीतील विनोदी कलाकारांचा फौजफाटा पाहायला मिळेल. यात सयाजी शिंदे आणि अभिनेता किशोर कदम हे मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. बाबो हा चित्रपटही गावखेडय़ातील कथानकावर आधारित आहे. त्यामुळे ग्रामीण व्यक्तिरेखा आणि भाषा यांचा उत्तम मेळ या चित्रपटात आहे, असे सांगत गेल्या काही वर्षांत मराठी मालिका आणि चित्रपटांमधून ग्रामीण भाषा, तेथील कथानक यांना जास्त पसंती मिळत असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

मराठीच नव्हे तर सध्या कुठल्याही भाषेतील चित्रपट असू दे तुमचा आशय, तुमची गोष्ट चांगली असेल तर इतर कुठल्याही गोष्टींच्या मर्यादा चित्रपटाला येत नाहीत. मात्र सध्या मराठीबरोबरच हिंदूी चित्रपटांमध्येही ग्रामीण भाषा आणि गावखेडय़ातील कथानकांना जास्त महत्त्व आले असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. शुद्ध मराठी प्रमाण भाषा प्रेक्षकांना सातत्याने ऐकायला मिळते. तसंच शहरी कथा आणि तेथील वातावरण, एकूणच जीवनशैलीतील बदल हे सगळं लोकांना माहिती आहे. मात्र ग्रामीण भाषेतील मालिका आणि चित्रपटांमुळे एक वेगळं जग प्रेक्षकांना पाहायला मिळालं. प्रत्येक गावचं वातावरण, तिथल्या व्यक्तिरेखा, त्यांची भाषा वेगळी असते. त्यामुळे तो तिथल्या मातीतला अस्सलपणा नव्याने प्रेक्षकांना अनुभवता आला. ग्रामीण भाषेतील चित्रपटांमुळे एक जिवंतपणा आला जो प्रेक्षकांनाही भावला. त्यामुळे फक्त मराठीतच नाही तर आज देशभरात स्थानिक क था-भाषा असलेल्या चित्रपटांना लोकांची पसंती मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबो या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी शिंदे खूप वर्षांनी अभिनेता किशोर कदम यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटातील कथेनुसार एकमेकांचे वैरी म्हणून समोरासमोर येणाऱ्या या दोन दिग्गज नेत्यांची विनोदी अभिनयाची जुगलबंदी हे या चित्रपटाचे आकर्षण ठरणार आहे. त्याबद्दल बोलताना गेली २० वर्षे आम्ही चित्रपटांमध्ये काम करत आहोत. आज खूप काळाने किशोरबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बाबोच्या सेटवर आमच्या अनुभवाचा फायदा घेत सातत्याने कथा आणि आमच्या व्यक्तिरेखांबद्दलची चर्चा, ऐनवेळी आपापल्या भूमिका उत्तम वठवण्यासाठी बदल करण्याची, उत्स्फूर्त अभिनयाची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे काम करतानाही खूप मजा आली, असं त्यांनी सांगितलं.

बाबो या चित्रपटात ते आबा नावाच्या तलाठय़ाची भूमिका करत आहेत. हा गावचा तलाठी आहे आणि त्याची मुलगी त्याचा कट्टर वैरी असलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. हे त्याला सहन होत नाही, त्यामुळे सतत एकमेकांमध्ये भांडणाऱ्या या दोघांमुळे संपूर्ण गाव विभागले गेले आहे. मात्र याच गावावर अचानक एक संकट कोसळते आणि ते संकट परतवण्यासाठी म्हणून गावक ऱ्यांकडे एकत्र येण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशावेळी ते काय करणार, असं या चित्रपटाचं गमतीदार कथानक असल्याचं त्यांनी सांगितलं. अरविंद जगताप यांनी अतिशय सुंदर अशी चित्रपटाची कथा लिहिली होती. त्यामुळे आमच्या वाटय़ाला आलेल्या व्यक्तिरेखा जितक्या उत्स्फूर्तपणे रंगवता येतील तितक्या त्या रंगवण्याचे काम आम्ही केले, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटात त्यांच्याबरोबर भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, विजय निकम, किशोर चौगुले अशा विनोदी कलाकारांचा ताफा आहे. त्यामुळे ही विनोदी भट्टी चांगलीच जमून आल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. या चित्रपटातून गेली कित्येक वर्षे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले रमेश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट होता आणि इतके सगळे अनुभवी, दिग्गज कलाकार त्यांच्याबरोबर तितकेच नवीन कलाकार अशी सरमिसळ असतानाही या प्रत्येकाला सांभाळून घेत उत्तम चित्रपट रमेश चौधरींनी केला असल्याची कौतुकाची पावतीही त्यांनी दिली.

गेली अनेक वर्षे दक्षिणेतील नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर तसेच हिंदीतही संजूसारख्या निवडक हिंदी चित्रपटांतून काम करण्याचा अनुभव सयाजी शिंदे यांच्या गाठीशी आहे. सध्या मराठी चित्रपटांमध्येही तितकेच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा आणीबाणी हा आणखी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो, तिथे मोठमोठय़ा निर्मिती संस्था कार्यरत असतात. तिथे कामाची एक शिस्त असते, दिग्दर्शक-तंत्रज्ञ-कलाकार अशा सगळ्याच बाबतीत तिथे नावाजलेले लोक एकत्र येऊन काम करत असतात. मात्र शेवटी चित्रपट ही एक कला आहे आणि ते कोणा एकाचे नाही. तर या सगळ्यांनी मिळून करायचे काम असते हे लक्षात ठेवले पाहिजे, असं ते म्हणतात. मी नेहमी म्हणतो खेळ आणि कला ही अशी दोन क्षेत्रं आहेत जिथे तुम्ही जे आहात, जसे आहात त्याचा कस लागतो. खेळात कसे शिरलात हे महत्त्वाचे नाही. तर खेळात शिरल्यावर तुम्ही तुमचा खेळ किती उत्तम करताय हे महत्त्वाचं आहे. तुमच्या खेळाचा दर्जा तिथे पाहिला जातो. तेच कलाकाराच्या बाबतीतही आहे. समोर चांगले कलाकार, दिग्दर्शक असोत किंवा अन्य कोणी.. तुम्ही तुमचा अभिनय किती उत्तम करताय यावर तुमचं यश अवलंबून असतं. हेच लक्षात घेऊन मी तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटात इतकी वर्षे काम करतो आहे, असे त्यांनी सांगितले. हिंदी-मराठी-दाक्षिणात्य असा इंडस्ट्रीत फरक करण्याचे काहीच कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. विनोदाची चुरचुरीत फोडणी असलेला बाबो हा त्यांचा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. त्यानंतर आणीबाणी प्रदर्शित होईल. याशिवाय, आणखी एकेक तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांवर आपले काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

First Published on May 26, 2019 1:06 am

Web Title: sayaji shinde babo movie