‘माव्‍‌र्हल’पटातील नताशा ऊर्फ ‘ब्लॅक विडो’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन सध्या चर्चेत आली आहे ती ऑस्कर पुरस्कार नामांकनामुळेच.. स्कार्लेटला या वेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि साहाय्यक अभिनेत्री अशा दोन विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. ‘मॅरेज स्टोरी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचं तर ‘जोजो रॅबिट’ चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिला नामांकनं मिळाली आहेत.

कुख्यात टोळीतला गुन्हेगार ते प्रसिद्ध धावपटू…!

जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री; यांना पुरुष म्हणावे की महिला?

एकाच वेळी दोन विभागांतील पुरस्कारांसाठी नामांकनं मिळण्याचा प्रकार तसा दुर्मीळ असतो. आणि हा योग स्कार्लेटच्या कारकीर्दीत जुळून आला असल्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. स्वत: स्कार्लेट यामुळे खूप आनंदी आहे, मात्र पुरस्कारांसाठी तिने आर्ट फिल्मच करायच्या अशा मर्यादा किंवा बंधनं कधीच घालून घेतली नव्हती. पण कारकीर्दीच्या सुरुवातीलाच काही चांगले धडे मिळाल्याचं ती सांगते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने १९९५ साली सीन कॉनेरी आणि लॉरेन्स फिशबर्न यांच्याबरोबर ‘जस्ट कॉज’ हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटादरम्यानची आठवण तिने सांगितली. याचं चित्रीकरण सुरू असताना तिची आणि लॉरेन्स यांची गाठभेट झाली. तेव्हा त्यांनी तिला विचारलं की तुला ऑस्कर पुरस्कार हवा आहे की स्टारडम? खरं तर त्या वेळी त्यांच्या त्या प्रश्नावर आपला गोंधळ झाला होता, असं तिने सांगितलं. मी ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि मूव्ही स्टार दोन्ही बनू शकते, असाच विचार माझ्या मनात होता. त्या वेळी.. त्यांना नेमकं मला काय विचारायचं होतं हे तेव्हा मला कळलं नव्हतं. हळूहळू मला ते समजलं. तुम्हाला जर उत्तम अभिनेत्री बनायचं असेल तर तुम्हाला आपल्या कलेवर खूप मेहनत घ्यायला हवी. जर तुम्हाला मूव्ही स्टार व्हायचं असेल तर.. या दोन गोष्टी खरंच वेगळ्या आहेत. हे नंतर समजलं, असं तिने मनमोकळपणाने एका कार्यक्रमादरम्यान कबूल केलं.

स्कार्लेटने साकारलेल्या ब्लॅक विडोच्या भूमिकेचा माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये तरी अंत झाला आहे. त्यामुळे पुढच्या माव्‍‌र्हलपटात ती नसेल कदाचित.. पण ब्लॅक विडोची पूर्वकथा सांगणारा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यात मात्र स्कार्लेट पुन्हा एकदा ब्लॅक विडोच्या भूमिकेत तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे.