कुछ कुछ होता है, कधी खुशी कभी गम, स्टुडंट ऑफ द इअर अशा सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक करण जोहरचं कलाविश्वामध्ये विशेष स्थान आहे. उत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन या साऱ्यामुळे तो बॉलिवूडमधील लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. नुकतीच स्कोर ट्रेंड्स इंडियाने सहा महिन्यातील बॉलिवूडमधले सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची एक यादी काढली आहे. या यादीनुसार करण जोहर लोकप्रियतेत अग्रेसर असल्याचे दिसून आलं आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी तयार केली आहे. या यादीमध्ये करण जोहर पहिल्या स्थानी, 2.0 चे दिग्दर्शक दुसऱ्या स्थानी, फरहान अख्तर तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शेट्टी चौथ्या क्रमांकांवर असून अनुराग कश्यप पाचव्या स्थानावर असल्याचं दिसून येत आहे.

‘सिम्बा’, ‘केसरी’, ‘कलंक’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ या चित्रपटांमुळे करण जोहर बॉलिवूडच्या फिल्ममेकर्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. तसेच, त्याच्या कॉफी विथ करण सीजन ६ हा शो लोकप्रिय ठरला. स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्स अशा लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण १०० गुणांसह पहिल्या पदावर आहे.

 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या लोकप्रिय फिल्ममेकर शंकर ८९.१५ गुणांसह लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ चे दिग्दर्शक शंकर यांना डिजीटल श्रेणीमध्ये ९३.०७ गुण, व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये १७ गुण आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये १०० गुणांसह लोकप्रियतेत दुसरे पद मिळाले आहे.

लोकप्रियतेमध्ये  फिल्ममेकर फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर आहे. आपली फिल्म ‘गली बॉय’ आणि वेबसीरिज ‘मेड इन हेवन’ची लोकप्रियता तसेच, मॉडेल शिवानी दांडेकरसोबतच्या डेटिंगच्या न्यूजमूळे फरहान अख्तरला लोकप्रियतेत तिसरे स्थान मिळाले आहे. फिल्ममेकर आणि टेलीव्हिजनचा लोकप्रिय होस्ट रोहित शेट्टी ३०.२४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपली ब्लॉकबस्टर फिल्म ‘सिम्बा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या सर्वाधिक टीआरपीमुळे रोहित शेट्टी चौथ्या पदावर आहे. तसेच गेल्या महिन्यापासून ‘सुर्यवंशी’ चित्रपटाविषयी मीडियामध्ये छापून येत असलेल्या बातम्यांमुळे रोहित शेट्टी सतत चर्चेत राहिला आहे.

नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेबमालिका ‘सॅक्रेड गेम्स’चा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या या वेबसीरिजच्या दुस-या पर्वाविषयी सध्या प्रेक्षकांच्या वाढलेल्या उत्कंठेमुळे सतत चर्चेत राहिला आहे. तसेच हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’चा ही तो निर्माता आहे. या सिनेमाच्या सातत्याने होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे आणि सोशल मीडियावर आपल्या बेधडक विधानांमुळे अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये यंदा सातत्याने राहिला आहे. तसेच अनुराग कश्यपची नुकतीच रिलीज झालेली फिल्म ‘गेम ओवर’ सुध्दा अनुरागला प्रकाशझोतात ठेवायला कारणीभूत ठरली.