आसक्त निर्मित ‘सीझन एक्स एपिसोड वाय’चा शनिवारी प्रयोग

पुण्याच्या नाटय़क्षेत्रात आसक्त या संस्थेचं योगदान मोठं आहे. या संस्थेतून वैविध्यपूर्ण नाटकांसह मोहित टाकळकरसारखा राष्ट्रीय स्तरावर नावाजलेला दिग्दर्शक, राधिका आपटे, सागर देशमुख असे उत्तमोत्तम अभिनेते पुढे आले. नव्या जाणिवांचा सर्जनशील आविष्कार आसक्तच्या नाटकांतून सातत्याने होत राहिला. आता नव्या पिढीचे कलाकार आसक्तच्या पायवाटेवरून जात आहेत. आसक्तने निर्मिती केलेलं सुयोग देशपांडे दिग्दर्शित ‘सीझन एक्स एपिसोड वाय’ हे नवं नाटक रंगमंचावर येत आहे. शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुदर्शन रंगमंच इथं हा प्रयोग होणार आहे.

माणसांच्या आंतरिक संघर्षांचा, तुटलेपणाचा निरनिराळ्या पातळ्यांवर असणाऱ्या भयप्रद जाणिवांचा, अधुरेपणाचा एक कॅलिडोस्कोप जो दिसताना वेगवेगळ्या प्रतिमांमधून एकमेकांशी असंबद्ध असतानाही कुठेतरी मानवी मूल्यांचा धागा पुढे पुढे सरकवत आपल्या आयुष्याशी थेट भिडणारा आहे. माणसं जगताना त्यांच्या जगण्याचा परीघ बांधलेला असतो आणि या परिघामध्ये वेगवेगळ्या स्तरावर एकमेकांपासून पूर्णपणे दुरावलेपणा येतो. पण तरीही मानवी भावना एकमेकांना सतत जोडून ठेवतात. अमूर्त पातळीवर ही असंबद्धता मूर्त रूपामध्ये माणसांना जोडत असते. सभोवताली असलेल्या, आपल्या आयुष्याशी थेट संबंध असलेल्या प्रतिमा या नाटकातून उभ्या करण्यात आल्या आहेत. शॉर्ट प्ले या प्रकारातलं नाटक जगभरात केलं जातं. काही मिनिटांचं असं हे नाटक असतं. जगभरातले काही शॉर्ट प्लेज एकत्र करून त्याद्वारे आजच्या काळाशी सुसंगत असं नाटय़ घडवण्याचा प्रयत्न सीझन एक्स एपिसोड वाय हे नाटक करतं. ३५० शॉर्ट प्लेजमधून वीस शॉर्ट प्लेज त्यासाठी निवडण्यात आले.

सुयोग देशपांडे या नव्या दमाच्या दिग्दर्शकानं या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात हृषीकेश पुजारी, आदित्य मनगाटे, मानसी भवाळकर, जीवक मोरे, अथश्री ठुबे, सिद्धेश धुरी, सुरभी ढमाळ, वैभव टाके हे आठ कलाकार मिळून ३५ व्यक्तिरेखा उभ्या करणार आहेत. सचिन लेलेनं प्रकाश योजना, सूरज जैस्वालनं संगीत, देविका काळेनं वेशभूषा केली आहे.

नाटकाविषयी सुयोग म्हणाला, आसक्तचं नवं नाटक नव्या कलाकार, दिग्दर्शकाचं असावं यासाठी मोहित टाकळकर आणि आशिष मेहता प्रयत्नशील होते. आजच्या काळाशी नातं सांगणारं, नव्या पिढीच्या जाणिवा प्रकर्षांनं व्यक्त करणारं नाटक करायचं होतं. आताच्या काळात मनोरंजनाचा वेळ कमी होत चालला आहे.

वेब सीरिज, शॉर्टफिल्म्स, एकांकिका असं कमी वेळात मनोरंजन मिळवलं जातं. त्यातूनच शॉर्ट प्लेच्या संकलनाची कल्पना पुढे आली. जगभरातल्या शॉर्ट प्लेजसह आम्हीही काही इम्प्रोवायझेशन्स केली आहेत. एक वेगळा प्रयोग या निमित्तानं करून पाहण्याची संधी मिळाली आहे.

chinmay.reporter@gmail.com