News Flash

कलाकारांचा कृतिपट

 ‘आपण आपल्यापर्यंत संसर्ग येऊ दिला नाही तर तो इतरांपर्यंत पोहोचणार नाही.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असूनही अद्याप लोकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत गांभीर्य दिसत नसल्याने आता कलाकार जनजागृतीसाठी पुढे आले आहेत. घराबाहेर पडू नका, सकारात्मकता बाळगा असा संदेश कलाकार समाजमाध्यमांच्या आधारे देत आहेत. काही कलाकारांनी स्वत: रक्तदान करून लोकांना त्यासाठी आवाहन केले आहे. आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीपासून ते समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवत काढलेल्या छायाचित्रांपर्यंतची सगळी माहिती देण्यात आपली समाजमाध्यमे खर्ची घालवणाऱ्या बॉलीवूड कलाकारांनीही सध्या त्याचा वापर करोनाकाळात नागरिकांच्या मदतीसाठी सुरू केला आहे. के वळ जनजागृती करून कलाकार थांबलेले नाहीत तर आर्थिक मदत उभी करण्यापासून प्राणवायू सिलेंडर्स उपलब्ध करणे, कोव्हिड सेंटर उभारणीसाठी मदत करणे अशा मदतकार्यातही ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.

गेल्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना कलाकारांनी एक पाऊल पुढे टाकत प्रतिबंधात्मक नियमांबाबत नागरिकांना आवाहन केले, चित्रफिती निर्माण केल्या, शक्य तिथे मदतीसाठी ते स्वत: उभे राहिले. आताही करोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी, मदतीसाठी कलाकार पुन्हा एकदा सरसावले आहेत. मराठी नाट्य कलाकार संघाने चित्रफितीच्या माध्यमातून ‘गरज नसेल तर कशाला?’ असा प्रश्न विचारला आहे. कारणाविना लोक घराबाहेर पडत असल्याने त्याला आळा बसावा म्हणून हे आवाहन करण्यात आले आहे. या चित्रफितीत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेते शशिकांत गंधे, अभिनेते विवेक लागू, शरद पोंक्षे, विजय पाटकर, मयुरेश पेम, दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांचा सहभाग आहे. याशिवाय भरत जाधव, केदार शिंदे, दीपक राज्याध्यक्ष, सारंग साठ्ये आणि इतर रंगकर्मीही जनजागृती करून लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

‘आपण आपल्यापर्यंत संसर्ग येऊ दिला नाही तर तो इतरांपर्यंत पोहोचणार नाही. ज्यामुळे आपल्याला देशातील संसर्गावर नियंत्रण मिळवता येईल. आठ दिवसांच्या भाज्या एकदाच आणा, सोसायटीच्या आवारातच व्यायाम करा, बाहेर न पडता पोलीस प्रशासनाला सहकार्य करा,’ असे आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केले आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी यानेही समाजमाध्यमांचा वापर केवळ करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे. ‘करोनाचे युद्ध जिंकण्यासाठी समाजमाध्यम उपयोगी ठरू शकते. याद्वारे सकारात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवून एकमेकांना आधार देण्याचे काम करू या. समाजमाध्यमांद्वारे मनोरंजनात्मक मजकूर पोहोचवण्याऐवजी लोकांच्या मदतीसाठी त्याचा वापर करू या,’ असा संदेश त्याने दिला.

बॉलीवूडही सक्रिय

आत्तापर्यंत घराणेशाहीवरून होणाऱ्या टीके ला तोंड देण्यातच व्यग्र असलेल्या धर्मा प्रॉडक्शन आणि यशराज प्रॉडक्शन या दोन मोठ्या चित्रपट निर्मिती संस्थांनी आपापल्या परीने मदतकार्यात उडी घेतली आहे. धर्मा प्रॉडक्शनची समाजमाध्यमे यापुढे के वळ करोना जनजागृतीसाठीच कार्यरत राहणार असल्याचे निर्मिती संस्थेने इन्स्टाग्रामवर जाहीर के ले आहे. ‘युवा’ या संस्थेच्या सहकार्याने करोनासंदर्भातील आवश्यक माहिती, औषधे-इंजेक्शन यांची उपलब्धता या साऱ्या संदर्भातील माहिती लोकांपर्यंत धर्मा प्रॉडक्शनच्या समाजमाध्यमांवरून पोहोचवण्यात येणार आहे.

ल्ल यशराज प्रॉडक्शनने याआधी रोजंदारीवर असलेल्या चित्रपट कर्मचारी आणि तंत्रज्ञांसाठी मदतकार्य सुरू के ले होते. आता त्यांनी ‘द यश चोप्रा फाऊंडेशन्स साथी इनिशिएटिव्ह’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत चित्रपटसृष्टीतील वयोवृद्ध कलाकार-तंत्रज्ञ आणि महिला कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. शिवाय, रोजंदारीवर असणाऱ्या कलाकारांना महिनाभर त्यांच्या चारजणांच्या कु टुंबाला पुरेल एवढा किराणा वाटपही करण्यात येणार आहे. ‘युथ फीड इंडिया’ या सामाजिक संस्थेबरोबर ते हा उपक्रम राबवणार आहेत.

ल्ल सलमान खाननेही रोजंदारीवर काम करणाऱ्या कलाकारांना आर्थिक मदत देऊ के ली आहे. त्याने याआधी पोलीस अधिकारी आणि इतरांसाठी तयार अन्नाची पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. रोजच्या रोज पाच हजार अन्नाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या तो देतो आहे. शिवाय, रोजंदारीवर काम करणारे तंत्रज्ञ, स्टंट्समन, ज्युनिअर कलाकार अशा २५ हजार जणांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत म्हणून त्याच्याकडून देण्यात येणार आहेत.

ल्ल अभिनेता अजय देवगण याने दादर येथे अतिदक्षता विभाग असलेले करोना रुग्णालय उभारण्यासाठी मदत के ली असून बृहन्मुंबई महापालिके च्या मदतीने करोनासंदर्भातील आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यासाठीही तो काम करतो आहे. त्याच्या ‘एनवाय’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही मदतकार्य सुरू आहे. अभिनेता सोनू सूदनेही अशाच प्रकारे प्राणवायू सिलेंडर्स, इंजेक्शन्स, जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटांची उपलब्धता करून देण्यासाठी मदतकार्य सुरू के ले आहे.

ल्ल करोनाची बाधा झाल्यानंतर विलगीकरणात असलेल्या भूमी पेडणेकरने प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे. अभिनेता अक्षय कुमारने क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या दिल्लीतील सामाजिक संस्थेला करोना रुग्णांच्या मदतकार्यासाठी १ कोटी रुपये दिले आहेत, तर त्याची पत्नी ट्विंकलनेही प्राणवायू सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ल्ल अभिनेता गुरमीत चौधरीने लखनऊ आणि पाटणा येथे हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत दिली. शाहीद आणि मीरा कपूर, तापसी पन्नू, कतरिना कैफ, दिया मिर्झा, अभिनेता ताहिर भसीनसह अनेक टीव्ही कलाकारांनीही करोना संबंधित उपयुक्त माहिती समाजमाध्यमांवरून देण्यास सुरुवात केली आहे. प्रियांका जोन्स, अनुष्का शर्मा-विराट कोहली, लारा दत्तासारख्या काही सेलिब्रिटींनी आर्थिक मदत देऊ के ली आहे. तर अनेक सेलिब्रिटी आर्थिक मदत उभी करून देण्यासाठीही कार्यरत झाले आहेत. सध्या मनोरंजनाची मात्रा कमी करून प्रत्यक्ष समाजाला मदत करण्याच्या भूमिके तून ते पुन्हा एकदा लोकांशी नव्याने जोडले जात आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने रक्तदान करून, ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याची जाण मला कलाकार म्हणून आहे. कलाकार हा संवेदनशीलच असतो. माझ्या रक्तदानातून एकाला जरी प्रेरणा मिळाली तर त्याचे समाधान असेल,’ असा संदेश लोकांना दिला आहे. अभिनेता संदीप पाठक यानेही मंगळवारी रक्तदान करून इतरांना रक्तदानासाठी आवाहन केले. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता आरोह वेलणकर यांनीही प्लाझ्मा दानासंदर्भात संदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:13 am

Web Title: second wave of corona infection bollywood actors donated blood akp 94
Next Stories
1 रणबीर कपूरची छायाचित्रकारांना तंबी
2 सिनेमा ऐकण्याची गोष्ट!
3 शालेय रंगभूमीचे पाईक
Just Now!
X