अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कलाविश्वातील ड्रग्सविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन सर्व स्तरांवर चर्चा होत असून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्यामुळे पूर्वकाळजी म्हणून त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे, असं ‘एनडीटीव्हीच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असतानाच अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. यामध्येच बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेट हा नवा मुद्दा समोर आला असून गेल्या काही दिवसांपासून हा विषय चर्चेचा मुद्दा झाला आहे. त्यातच जया बच्चन यांनी संसदेमध्ये या मुद्द्यावर भाष्य केलं. ‘ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत’, असा टोला जया बच्चन यांनी भाजपा खासदार रवी किशन आणि कंगना रणौत यांना लगावला.

जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र त्यांचा विरोध केला आहे. त्यामुळे पूर्वकाळजी म्हणून त्यांना मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. बच्चन कुटुंबाच्या जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे.