बॉलिवूड अभिनेत्री सीमा पाहवा यांना चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी जळपास तीन दशक लागले होते. पण आता त्यांना लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार असल्याचे वाटू लागले आहे. सीमा पाहवा यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “हम लोग” या लोकप्रिय मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारताना दिसल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी “दम लगा के हईशा”, “बरेली की बर्फी” आणि “शुभ मंगल सावधान” या चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटांमधून त्यांनी तरुण पिढीच्या मनात घर करत अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली.

‘प्रेक्षकांना एखाद्या विषयावर आधारित चित्रपट आवडू लागले होते. पण आता स्वत:चे पैसे खर्च करुन आपल्या जीव धोक्यात घालून चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये येण्यापूर्वी प्रेक्षक दोन वेळा तरी नक्की विचार करतील. प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी संघर्ष करावा लागेल’ असे सीमा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सीमा पाहवा यांनी त्यावेळी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि विकी कौशल यांचे उदाहरण दिले आहे. या कलाकारांनी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या वळणावर नेले आहे. आता त्यांचे लाखो चाहते आहेत. पण त्यांना देखील प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये आणण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे असे सीमा यांनी पुढे म्हटले आहे.