भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या. खरे तर तेही या एकाच पद्धतीच्या भूमिकांना कंटाळले होते. मात्र दूरदर्शनवरून काही वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘महाश्वेता’ या मालिकेतील प्रेमळ, तत्त्वनिष्ठ व ध्येयनिष्ठ शिक्षकाच्या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली.  हे अशी भूमिकाही खूप छान करतात, आपले वडील असावे तर यांच्यासारखे, अशा कौतुकाच्या प्रतिक्रिया ज्यांना मिळाल्या ते आहेत ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन..

गेली पन्नास वर्षे ते मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. आज वयाच्या ७९ व्या वर्षांत असलेल्या पटवर्धन यांनी काम कमी केले असले तरी पूर्णपणे थांबविलेले नाही, कारण ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटय़ात ते आजही काम करतात. यात त्यांनी ‘औरंगजेब’ साकारला आहे.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांतला पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ‘वस्ताद पाटील’ अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आज इतक्या वर्षांनंतरही कोणी त्यांना भेटले की ‘गप्पागोष्टी’चा विषय निघतोच. त्यामुळे ‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांची सुरुवातही त्या ‘गप्पागोष्टी’नेच झाली. त्याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना पटवर्धन म्हणाले, शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. मनोरंजनाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रबोधन होईल, असा एखादा कार्यक्रम करण्याबाबतचा प्रस्ताव फुलसुंदर यांनी मानसिंग पवार यांच्यापुढे ठेवला होता. आमचा रेडिओसाठी प्रायोजित कार्यक्रम करणारा एक चमू होता. त्यात मानसिंग पवारही होते. त्यांनी मला यातील ‘वस्ताद पाटील’ या भूमिकेविषयी विचारले आणि मी होकार दिला. कार्यक्रम इतका लोकप्रिय होईल, असे आम्हालाही वाटले नव्हते. ‘बीबीसी’ या जगविख्यात वृत्तवाहिनीकडूनही या ‘गप्पागोष्टी’ची दखल घेतली गेली. १०० भाग प्रसारित झाल्यानंतर तो कार्यक्रम थांबविला. २२ मिनिटांचा आमचा हा कार्यक्रम ‘वन शॉट वन टेक’ व्हायचा. चित्रीकरणापूर्वी आम्ही थोडा वेळ तालीम करायचो आणि नंतर थेट चित्रीकरण. माया गुर्जर, राजा मयेकर, वसंत खरे, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी, मानसिंग पवार अशी आमची टीम होती. दूरदर्शनबरोबरच्या ऋणानुबंधाची त्यांनी आणखी एक आठवण जागविली. दूरदर्शनवर जे पहिले मराठी नाटक ‘लाल गुलाबाची भेट’ सादर झाले त्या नाटकात मी काम केले होते. रत्नाकर मतकरी लिखित या नाटकात श्रीकांत मोघे, कानन कौशल, सुधीर जोशी अशी बाकीची मंडळी होती.

दूरदर्शन आणि ‘गप्पागोष्टी’च्या आठवणीपासून सुरू झालेल्या गप्पांचा पुढील टप्पा साहजिकच पटवर्धन यांच्या दीर्घकाळच्या नाटय़ प्रवासाचा होता. रंगभूमीवरील नाटय़प्रवासाच्या स्मरणरंजनाबद्दल त्यांनी सांगितले, मी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. नोकरीच्या कालावधीत बँकेतील माझे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे नोकरी सांभाळून आपल्याला नाटक करता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

१९६४ मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेत गो.म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात मी होतो. आमच्या बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची परवानगी पारखी यांच्याकडे मागितली आणि त्यांनीही ती दिली. योगायोग पाहा. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाटय़संस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान आम्ही या नाटकाचा प्रयोग केला असल्याने तुम्ही आमच्या नाटय़संस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का, अशी विचारणा पगार यांनी केली. या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका मी करत होतो. आमच्या नाटकातीलच सर्व कलाकार घेऊन आम्ही हा प्रयोग तुमच्यासाठी करू, या अटीवर आम्ही त्यांच्यासाठी प्रयोग केला. पुढे याच पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकात मी काम केले.

१९७० मध्ये ‘नाटय़निकेतन’च्या ‘हृदयस्वामीनी’ नाटकात काम केले. वसंत सबनीस लिखित आणि मो.ग. रांगणेकर दिग्दर्शित या नाटकात माझ्यासोबत शांता जोग होत्या. यात त्यांची भूमिका एकदम आधुनिक स्त्रीची होती. केसांचा बॉबकट आणि तोंडात सिगारेट असे त्यांचे रूप होते. या नाटकानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांचे ‘नटसम्राट’ नाटक आले. त्यात त्यांची एकदम वेगळी व सोज्वळ भूमिका होती. तेव्हा प्रेक्षकांनी त्यांची ही दोन्ही वेगवेगळी रूपे पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितली.

लहानपणी ‘बेकेट’ हा इंग्रजी चित्रपट पाहिला होता. आयुष्यात किमान एकदा तरी ही भूमिका करायला मिळावी, अशी इच्छा तेव्हापासून होती. पुढे इंडियन नॅशनल थिएटरने वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. बँकेतील माझे सहकारी भारत तांडेल यांनी दुभाषींना ‘बेकेट’साठी माझे नाव सुचविले. त्यांना भेटलो आणि मला ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेंद्री’ करायचे. या नाटकानंतर शिरवाडकर व माझे स्नेहबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका केल्या. विजया मेहता यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली. १९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात मला काम मिळाले. भूमिका छोटीच होती, पण या नाटकामुळे नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, मा. दत्ताराम, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले, त्यांचा अभिनय जवळून पाहता आला. खूप काही शिकायला मिळाले.  १९८५ मध्ये पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकात ‘काकाजी’ केला. नाटकाचे एक हजार प्रयोग केले. ‘सुंदर मी होणार’ हे नाटकही जवळपास दहा वर्षे केले. अभिनयाबरोबरच काही वर्षे आपण ‘निर्माता’ या भूमिकेतही होतो. ‘एकच प्याला’ आणि ‘तुफानाला घर हवंय’ या दोन नाटकांची निर्मिती व अभिनयही केला असल्याचे ते म्हणाले.

सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटय़ात ते औरंगजेबाची भूमिका करत आहेत. पटवर्धन यांना उर्दू लिहिता, वाचता आणि बोलता येते. महानाटय़ातील सर्व संवाद ध्वनिमुद्रित केलेले आहेत. यातील काही भूमिकांना त्यांनी आवाज दिला आहे. औरंगजेबाची भूमिका कोण करतोय, असे त्यांनी महानाटय़ाचे निर्माते महेंद्र महाडिक यांना विचारले. त्यावर त्यांनी ही भूमिका अद्याप कोणाला दिली नसल्याचे पटवर्धन यांना सांगितले. पटवर्धन यांनी ही भूमिका करायची करायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना ती मिळाली. या नाटकाचे अधूनमधून प्रयोग सुरू असतात.

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशा असाव्या सुना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’ ते अगदी अलीकडचा ‘हरी ओम विठ्ठला’ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात मला एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळाले हे माझे भाग्य.

पहिल्या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी शांतारामबापूंनी मला, ‘‘पटवर्धन, तुम्ही तुमचे काम चांगले करा. ‘रिटेक’ची काळजी करू नका,’’ असे सांगितले. सुदैवाने माझे पहिलेच दृश्य ‘फर्स्ट टेक’मध्ये ओके झाले. माझे काम पाहून शांतारामबापूंनी, ‘‘अरे, तुला या छोटय़ा भूमिकेऐवजी मोठे काम द्यायला हवे होते’’ अशा शब्दांत कौतुक केले. त्यांची ही शाबासकी म्हणजे माझ्या अभिनयाला मिळालेली पावतीच होती, असेही पटवर्धन अभिमानाने सांगतात.

‘तेरा पन्न्ो’ या हिंदी मालिकेत त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत काम केले. खरे तर ‘तेरा पन्न्ो’च्या एकाच भागासाठी त्यांची निवड झाली होती, पण माझे काम पाहून मालिकेच्या पुढील तेरा भागांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, अशी आठवणही त्यांनी सांगितली. दीर्घकाळच्या अभिनय प्रवासात त्यांना ‘ऑथेल्लो’ करायचे होते, पण तो योग काही  जुळून आला नाही. दत्ता भट यांच्यानंतर ‘नटसम्राट’मध्ये ‘अप्पासाहेब बेलवलकर’ साकारायची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी होकारही दिला होता, पण पुढे कुठे तरी माशी शिंकली आणि ती भूमिका पटवर्धन यांना मिळाली नाही. त्याबद्दल त्यांना थोडी खंत वाटते. ती भूमिका मी माझ्या शैलीत नक्कीच चांगली करण्याचा प्रयत्न केला असता आणि कदाचित माझ्याही अभिनय प्रवासाला वेगळे वळण मिळाले असते, पटवर्धन गप्पांच्या ओघात सहज सांगून जातात.

आता वयोपरत्वे पटवर्धन यांनी काम कमी केले असले तरी त्यांनी स्वत:ला अन्य व्यापात गुंतवून ठेवले आहे. संस्कृत भाषेची आवड असल्याने आज या वयातही त्यांचे संस्कृत ग्रंथांचे वाचन, अभ्यास सुरू असतो. पं. रविशंकर यांच्या म्युझिक स्कूलमध्ये ते काही महिने सतार शिकत होते. त्यात त्यांनी चांगली प्रगतीही केली होती, पण सतारवादनापेक्षा अभिनयाकडे जास्त ओढा असल्याने त्यांनी सतार थांबविली व सर्व लक्ष अभिनयाकडे दिले. संवादिनी ते छंद म्हणून वाजवितात. शास्त्रीय संगीत हे पटवर्धन यांचे पहिले प्रेम आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका ते पाहात नाहीत, पण वृत्तवाहिन्यांवरील बातम्या मात्र आवर्जून पाहतात. पत्नी नीतासह दोन सुपुत्र आणि एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे यांच्यात ते रमतात. आयुष्याच्या या टप्प्यावर ते आनंदी, समाधानी आहेत.

‘स्वगत’

जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना ‘प्रिझन डायरी’ लिहिली होती. त्याचा मराठी अनुवाद पु. ल. देशपांडे यांनी ‘स्वगत’ या नावाने केला आहे. पटवर्धन यांनी जयप्रकाश नारायण यांचे ते अनुभव ‘स्वगत’ या एकपात्री प्रयोगातून सादर केले होते. जयप्रकाश नारायण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम ‘एक्स्प्रेस टॉवर’ येथे रामनाथ गोएंका यांच्या निवासस्थानी असायचा. ‘स्वगत’चे एकपात्री सादरीकरण करण्यापूर्वी  ‘एक्स्प्रेस टॉवर’ येथे जयप्रकाशजींना ते दोन-चार वेळा भेटले. जयप्रकाश यांचे बोलणे, स्वभाव याचे निरीक्षण व अभ्यास त्यांनी केला आणि त्यानंतर ‘स्वगत’ सादर केले. मूळचे गिरगावकर असलेल्या पटवर्धन यांचे आता वास्तव्य ठाण्यात आहे. ते राहात असलेल्या त्यांच्या स्वत:च्या वास्तूचे नावही त्यांनी ‘स्वगत’ असेच ठेवले आहे.