गेल्या दोन–तीन वर्षांत सातत्याने बॉलीवूडला सिक्वलपटांनी चांगलाच हात दिला आहे. मोठमोठे चित्रपट तिकीटबारीवर सपाटून मार खात असताना ‘रेस’, ‘हाऊसफुल्ल’, ‘मस्ती’, ‘गोलमाल’ ते आत्ताच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’पर्यंत सगळ्याच सिक्वलपटांनी शंभर कोटींच्या वर गल्ला गोळा केला. त्यामुळे बॉलीवूड निर्माते आणि कलाकारांवर सध्या सिक्वल्सचे गारूड आहे. ‘हाऊसफुल्ल ३’चा निर्माता साजिद नाडियादवाला यांच्यासह अक्षय कुमार आणि रितेश देशमुखनेही तीन वर्षांतून एक सिक्वलपट करण्याचा संकल्प सोडला आहे.

एखादा चित्रपट चांगला चालल्यानंतर त्याची कथा एकतर पुढे न्यायची किंवा तीच पात्रे घेऊन प्रेक्षकांना नवीन कथा द्यायची हे दोन्ही फंडे तिकीटबारीवर खूप यशस्वी ठरले आहेत. चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा आधीच प्रस्थापित झालेल्या असल्याने त्यांच्या आधारावर नवीन चित्रपट केल्यानंतर तो यशस्वी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही, लोकांना ते आधीच परिचयाचे असतात, असे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सांगितले. सध्या एक चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर त्याचा सिक्वलही तितकाच यशस्वी ठरतो, असा अनुभव निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला आहे. तर बॉलीवूड कलाकारांना शंभर-दोनशे कोटींच्या क्लबमध्ये टिकून राहण्याची संधीही या सिक्वलपटांमुळे मिळत असल्याने त्यांचाही सिक्वलकडे ओढा वाढला आहे.

गेल्या वर्षी ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘एबीसीडी २’ आणि ‘वेलकम बॅक’ असे चार सिक्वलपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी कंगनाची दुहेरी भूमिका असलेल्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ने १५० कोटी रुपये कमावले, रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘एबीसीडी २’ने १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला. २००७ साली आलेल्या अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘वेलकम’चा सिक्वल आठ वर्षांनी प्रदर्शित झाला तरीही या चित्रपटाने ९६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. तर ‘प्यार का पंचनामा २’ या १८ कोटींच्या बजेटमध्ये केलेल्या सिक्वलनेही ६४ कोटी रुपयांची कमाई केली. या वर्षी ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाचा तिसरा सिक्वल प्रदर्शित होतो आहे. निर्माता साजिद नाडियादवालासाठी ‘हाऊसफुल्ल’ चित्रपट मालिका आत्तापर्यंतची सर्वाधिक गल्लाभरू, लोकप्रिय ठरली असल्याने यानिमित्ताने सिक्वलपटांच्या निर्मितीवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

सिक्वल्सच्या यशाचा परिणाम क लाकारांवरही झाला असून अक्षय कुमार आणि रितेशने तीन वर्षांतून एकदा सिक्वल करायचा निर्णय घेतला आहे. मुळात, अक्षय कुमार, अजय देवगण, रितिक रोशन, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चनसारखे कलाकार हे वेगवेगळ्या सिक्वलपटांचा भाग असल्याने तीन वर्षांच्या आतच वेगवेगळ्या सिक्वलपटांमधून त्यांना पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. या वर्षी हीट ठरलेल्या ‘बागी’चाही सिक्वल काढा म्हणून निर्माते-दिग्दर्शकांकडेच आताच धोशा सुरू झाला आहे.

गाजलेले सिक्वलपट

धूम ३ – २८०.२५ कोटी

क्रिश ३ – २४०.५० कोटी

दबंग २ – १५८.८० कोटी

तनु वेड्स मनु रिटर्न्‍स – १५० कोटी

सिंघम रिटर्न्‍स – १४१ कोटी