आपल्याकडे कथा-कादंबऱ्यांचा खजिना असतानाही मालिकांसाठी सहसा त्याला हात न लावण्याकडेच निर्मात्यांचा कल जास्त दिसून येतो. गेल्या दोन वर्षांत ‘जिंदगी’सारख्या नव्याने दाखल झालेल्या वाहिनीने पाकिस्तानी लेखक-लेखिकांच्या कथा-कादंबऱ्यांवरच्या छोटय़ा छोटय़ा भागांच्या मालिका सादर केल्या आणि त्याला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळाली. ‘जिंदगी’बरोबरच आणखीही काही नवीन वाहिन्या ‘जीईसी’ (जनरल एंटरटेन्मेट चॅनेल) विभागात दाखल झाल्या असल्याने स्पर्धा आणखीनच वाढली असून त्यासाठी आता निर्मात्यांना नव्या आशयाची गरज भासू लागली आहे. त्यामुळेच सध्या कथा-कादंबऱ्यांवर आधारित मालिकांची संख्या हळूहळू का होईना वाढताना दिसते आहे.
‘जिंदगी’सारख्या नव्याने आलेल्या वाहिनीने पाकिस्तानी लेखक-लेखिकांच्या कादंबऱ्या मालिकारूपात लोकांसमोर आणल्या. इश्तियाक या अगदी तरुण लेखिकेच्या ‘हमसफर’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाची मालिका पाकिस्तानमध्ये गाजली. फवाद खानची भूमिका असलेल्या या मालिकेला इथेही चांगला प्रतिसाद मिळाला. मर्यादित भागांच्या या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने आता अन्य वाहिन्यांवरही साहित्यावर आधारित मर्यादित भागांच्या मालिका सादर करण्यात येत आहेत. या आठवडय़ात ‘लाईफ ओके’ वाहिनीवर ‘एक था चंदर, एक थी सुधा’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. प्रसिद्ध लेखक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित धरमवीर भारती यांच्या ‘गुनाहों के देवता’ या कादंबरीवर आधारित ही मालिका आहे. १९४९ साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीच्या आत्तापर्यंत ७१ आवृत्त्या प्रकोशित झाल्या आहेत. भारत-पाक फाळणीदरम्यानची कथा सांगणारी आणखी एक मालिका या आठवडय़ात ‘झी टीव्ही’वर सुरू होते आहे. प्रसिद्ध लेखक राजिंदर सिंग बेदी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्याच ‘लाजवंती’ या दीर्घकथेवर आधारित त्याच नावाची मालिका सुरू होणार असून, मालिकेची निर्मिती बेदी यांची नात आणि प्रसिद्ध लेखिका, निर्माती इला बेदी-दत्ता यांनी केली आहे.  ‘लाजवंती’सारखी फाळणीदरम्यान घडलेली प्रेमकथा आता मालिकेच्या रूपाने आणण्यामागचे कारण स्पष्ट करताना या कथांमध्ये खूप आशय दडलेला असल्याचे ‘झी टीव्ही’चे व्यवसायप्रमुख प्रदीप हेजमाडी यांनी स्पष्ट केले. फाळणीचा काळ हा देशाच्या इतिहासातला एक आव्हानात्मक काळ समजला जातो. अनेक भावनिक, प्रेरणादायी अशा या काळातील कथा साहित्यिकांनी लिहून ठेवल्या आहेत. मात्र टीव्ही वाहिन्यांनी आजवर मालिकांसाठी कधी अशा साहित्याकडे पाहिलेले नाही. मात्र, प्रेक्षकांना या कथा पडद्यावर पाहायला आवडतात. त्यामुळेच ‘लाजवंती’सारखी कथा मालिकारूपाने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे हेजमाडी यांनी सांगितले.

सध्या ‘एपिक’ वाहिनीवर रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चोखेरबाली’, ‘चारुलता’ अशा गाजलेल्या कथा ‘स्टोरीज बाय रबींद्रनाथ टागोर’ नावाने दाखवण्यात येत आहेत. तर ‘अँड टीव्ही’वर सुरू असलेली ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ ही मालिका अनुजा चौहान यांच्या ‘दोज प्रायसी ठाकूर गर्ल्स’ या कादंबरीवर आधारित आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली आणि सध्या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरच्या आघाडीच्या मालिकांमध्ये सामील असलेली ‘यह है मोहोबतें’ ही मालिकादेखील अंशत: मंजू कपूर यांच्या ‘कस्टडी’ या कादंबरीवरून घेण्यात आल्याचे सांगितले जाते.