‘अंकुर’ या चित्रपटातून १९७४ साली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज वाढदिवस. शबाना यांनी गेली अनेक वर्ष बॉलिवूड आणि रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. शबाना यांनी आतापर्यंत १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. यात व्यावसायिक तसेच समांतर चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं आहे. मात्र शबाना यांची पहिली पसंती जावेद अख्तर नसून दुसराच एक अभिनेता आहे.

गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी शबाना आझमी यांचं नाव अभिनेता, दिग्दर्शक शेखर कपूरसोबत जोडलं गेलं होतं. ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या सेटवर शबाना व शेखर यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे त्याकाळी शबाना या टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्याचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत होते.तर शेखर कपूर यांनी कलाविश्वामध्ये फारसा जम बसवला नव्हता. परंतु शबाना यांच्याशी शेखर यांचं अफेअर असल्यामुळे ते कायम चर्चेत रहायचे. परंतु काही कारणास्तव या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला आणि त्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं.

दरम्यान, दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीला पाऊल ठेवणाऱ्या शबाना यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे.