पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमधील श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांच्या नावाचा हेतुपुरस्सर समावेश केल्याचा आरोप ज्येष्ठ अभिनेत्री आणि अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी केला आहे. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या श्रेय नामावलीत गीतकार जावेद अख्तर यांचं नाव आहे. आपण या चित्रपटासाठी एकही गाणं लिहिलेलं नसताना श्रेयनामावलीत नाव आलंच कसं असा प्रश्न खुद्द अख्तर यांनी ट्विट करत उपस्थित केला होता.

सर्वसामान्य प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी ‘पीएम मोदी’ या बायोपिकच्या निर्मात्यांनी जावेद अख्तर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक वापर केल्याची टीका शबाना आझमी यांनी ट्विटरद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटातील ‘ईश्वर अल्लाह’ हे गाणं जावेद यांचं नसून ते दीपा मेहता यांच्या ‘1947 अर्थ’ या चित्रपटातून घेतलेलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

‘पीएम मोदी’ या बायोपिकच्या ट्रेलरमध्ये श्रेयनामावलीत नाव असल्याचे पाहून धक्का बसल्याचे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले होते. गीतकार प्रसून जोशी, समीर, अभेंद्र कुमार उपाध्याय, सारदारा यांनी बायोपिकमध्ये योगदान दिले आहे, त्यांची नावे असणे योग्य आहे, पण जावेद यांचे नाव का घेतले, असा प्रश्न आझमींनी केला. दरम्यान, बायोपिकमध्ये जावेद यांची काही जुनी गाणी वापरली आहेत, त्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केल्याचे निर्माते संदीप सिंग यांनी स्पष्ट केले.