‘प्यार के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटाचा सीक्वेल असलेला ‘शादी के साइड इफेक्ट्स’ हा ‘व्हॅलेण्टाईन्स’ महिन्यातील सर्वाधिक प्रतीक्षेचा सिनेमा आहे.
‘शादी के साइड इफेक्ट्स’ या २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे फरहान अख्तर आणि विद्या बालन ही जोडी प्रथमच या चित्रपटातून झळकत आहे. ‘द डर्टी पिक्चर’मधून बॉलीवूडचे तेव्हाचे नायिकेबाबतचे निकष मोडीत काढत आपल्या अभिनय सामर्थ्यांवर यशस्वी भूमिका साकारणारी अभिनेत्री असे बिरूद विद्या बालनच्या नावामागे आहे. त्यानंतरचे विद्या बालनचे ‘कहानी’, ‘घनचक्कर’ हेही निराळे ठरले. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ती गाजली. त्यामुळे ‘शादी के साइड इफेक्ट्स’मध्ये तिला पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला पडद्यावर मिल्खा सिंग साकारणारा समर्थ अभिनेता फरहान अख्तर यानेही वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही फरहान यशस्वी ठरल्याने सीक्वेलपटाच्या दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखाली त्याचा अभिनय खुलतो का, हे पाहण्याची उत्सुकता आहे. विचारपूर्वक भूमिकांची निवड आणि ती भूमिका परिपूर्ण व्हावी म्हणून फरहान करीत असलेली मेहनत याची जाणीव प्रेक्षकांना झाली आहे. रूढार्थाने तद्दन गल्लाभरू बॉलीवूडपटासाठी कोणत्याही दिग्दर्शक-निर्मात्याने फरहान-विद्या या जोडीचा विचार केलाच नसता. परंतु लग्नसंस्थेवर आणि त्यातील बंधने, बेडी याबाबत लग्न झाल्यानंतर नायकाला काय वाटते, जाणवते या विषयावर हा चित्रपट आहे.
लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतरही आपल्या जीवनावर, व्यक्तिमत्त्वावर त्याचे दुष्परिणाम होतात असे सुचविणारे चित्रपटाचे शीर्षक असल्यामुळेही नुकतेच लग्न झालेली तरुण जोडपी, लग्न होऊन आई-बाबा झालेली दाम्पत्ये, लग्नाला १०-१५ वर्षे झालेली आणि संसारात स्थिरावलेली मध्यमवयीन दाम्पत्ये आणि आजी-आजोबा बनलेली दाम्पत्ये आणि मुख्य म्हणजे ज्यांचे विवाह ठरले आहेत, प्रेमविवाह ठरलेली जोडपी त्याचबरोबर ज्या तरुण-तरुणींना नजिकच्या काळात विवाहबद्ध व्हायचे आहे अशा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना या चित्रपटाच्या शीर्षकामुळे त्याविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. लेखक-दिग्दर्शक साकेत चौधरीने ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. २००६ साली झळकलेल्या या चित्रपटाने आश्चर्यकारकरीत्या यश मिळविले. यातही दिग्दर्शकाने मल्लिका शेरावत – राहुल बोस अशी वेगळी जोडी घेतली होती. लग्न करून कायमस्वरूपी अनेक जबाबदाऱ्या आणि एकाच बायकोवर प्रेम करण्याचे वचन देणे याला घाबरून लग्नापासून पळू पाहणारा तरुण राहुल बोसने उत्तम साकारला होता. या चित्रपटाचा संदर्भ घेऊन संपूर्णपणे वेगळा असा ‘शादी के साइड इफेक्ट्स’ असेल. लग्न झाल्यानंतर आपण ‘बॅचलर’ होतो तेच बरे होते असे वाटायला लागणारा नवरा, लग्नसंस्था, बायको, अन्य जबाबदाऱ्या, भावनिक गुंतवणूक याबाबत लग्न झाल्यानंतर तो या सगळ्या गोष्टींकडे कसा पाहतोय हे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या चित्रपटात केला असावा असा अंदाज चित्रपटाच्या पोस्टर, प्रसिद्धीवरून बांधता येईल. लग्न झाल्यानंतर पुन्हा बायकोच्या प्रेमात पडणारा नवरा आणि नव्याने प्रेम करू लागणारे तरुण जोडपे अशी काहीशी या चित्रपटाची संकल्पना आहे. प्रमुख कलावंत वगळता चित्रपटाचे तंत्रज्ञ, संगीतकार व टीममधील अन्य सीक्वेलपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.
आजच्या काळातील आधुनिक विचारांचे दाम्पत्य पाहायला मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीच्या कार्यक्रमांमध्ये विद्या बालनने या चित्रपटाबद्दल सांगतानाच हा संपूर्णपणे नायकाचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर भर देणारा चित्रपट आहे, असे म्हटलेय. संगीतकार प्रीतम चक्रवर्तीने तब्बल ११ गाणी केली आहेत. ‘हॅरीज नॉट ए ब्रह्मचारी’, ‘आय अ‍ॅम सॉरी पर तुम से प्यार हो गया’, ‘तौबा मैं ब्याह करके पछताया’, ‘बावला सा सपना’, ‘देसी रोमान्स’, ‘यहाँ वहाँ’ असे वेगवेगळ्या गाण्यांचे सुरुवातीचे शब्द आहेत. यावरूनही उत्सुकता निर्माण व्हायला हरकत नाही.
रुपेरी पडद्यावरचे दोन्ही यशस्वी कलावंत प्रथमच एकत्र येत असून ही अनोखी जोडी यशस्वी ठरली, तर बॉलीवूडमध्ये अशा आघाडीच्या कलावंतांच्या अनोख्या जोडय़ा पडद्यावर आणण्याचे धाडस यापुढेही निर्माते-दिग्दर्शक करू शकतील.