News Flash

बॉलीवूडची सावली

चित्रपट हे टीमवर्क म्हटलं जातं. या टीमचा कॅप्टन कोणी एक दिग्दर्शक असतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून कथा पडद्यावर आकार घेते. पण, मुळात दिग्दर्शकही एकटा नसतो.

| November 2, 2014 07:02 am

चित्रपट हे टीमवर्क म्हटलं जातं. या टीमचा कॅप्टन कोणी एक दिग्दर्शक असतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून कथा पडद्यावर आकार घेते. पण, मुळात दिग्दर्शकही एकटा नसतो. त्याच्या चित्रपटाची सुरुवात ही कथालेखनापासून झालेली असते. कुठली तरी एक गोष्ट त्याला आवडते. पण, त्या गोष्टीची पटकथा तयार करायची असते, त्यातील व्यक्तिरेखांचा जन्म व्हायचा असतो. मग पडद्यावर ती कशी दिसतील इथपासून ते चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होईपर्यंत कोणा एकाची सराईत नजर या सगळ्या कामावर असावी लागते. ती कोणी एक ही महत्त्वाची जागा कथालेखक, अभिनेता हरहुन्नरी विकास कदम याने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या टीममध्ये पटकावली आहे. हिंदीत काम केल्यानंतर विकासने पहिल्यांदाच ‘विटी दांडू’ या चित्रपटाची कथा लिहिली असून तो मराठीत पुन्हा एक चांगली कलाकृती घेऊन लोकांसमोर येतो आहे..
एकांकिका, रंगभूमी मग टिपरे कुटुंबातला शिऱ्या अशा विविध भूमिकांमधून विकास लोकांना परिचित आहे. ‘गोलमाल’पासून विकास कदमचं नाव हिंदीत गाजतंय. ‘गोलमाल’पासून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असा विकासचा आत्तापर्यंतचा प्रवास झाला आहे. मात्र, रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या टीममधला एक महत्त्वाचा माणूस असलेला विकास त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा का आहे? तर चित्रपट करायचा असं जेव्हा म्हणून आम्ही तयारीला बसतो तेव्हा आमच्यासमोर काहीच नसतं. म्हणजे दर वेळी अरे, आपल्याला काहीच येत नाही आहे इथपासून सुरुवात होते. त्यानंतर मग कथा, व्यक्तिरेखा, प्रसंग लिहून काढणं, त्याच्यावरच्या चर्चा ते सगळं निश्चित झाल्यानंतर ते कास्टिंग डिरेक्टरला समजावून सांगणं, तुमच्या कलाकारांना त्यांच्या भूमिका समजावून देणं, त्यांच्याकडून ते करून घेणं, लोकेशन्स ठरवणं, चित्रीकरणाचे शेडय़ूल्स सांभाळणं, चित्रीकरणानंतर मग मिक्सिंग, डबिंग ते प्रसिद्धी कार्यक्रम आणि अंतिमत: चित्रपट प्रदर्शित होणे इथपर्यंतच्या प्रत्येक प्रक्रियेत मी सावलीसारखा वावरत असतो, असे विकास सांगतो. फक्त पाटर्य़ाना जात नाही.. त्यामुळे कधीच कॅमेऱ्यासमोर येत नाही, असे तो गमतीने सांगतो. रोहित शेट्टी आणि टीमबरोबर इतके वर्षे काम केल्यानंतर चित्रपटाच्या कथेपासून ते प्रेक्षकांच्या मानसिकतेपर्यंत अनेक  गोष्टींचा अभ्यास करून बॉलीवूडचं गणित त्याच्या मनात पक्कं झालं आहे.
व्यावसायिक चित्रपटांचे ठोकताळे वगैरे आपण म्हणतो. पण, देशभरात सगळ्यांना आवडेल असा व्यावसायिक चित्रपट बनवणं खरंच अवघड आहे असं विकास म्हणतो. इथे महाराष्ट्र आहे, तिथे उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर प्रत्येक ठिकाणी लोकांची मानसिकता वेगळी, त्यांच्यातल्या प्रत्येकाचा जगण्याचा स्तर, शैली, आर्थिक स्थिती वेगळी.. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथल्या प्रत्येकाला तोच एक चित्रपट आवडला पाहिजे, असा चित्रपट करणं खरोखरच अवघड आहे, असं तो सांगतो. एकतर तुम्ही चित्रपट कुठल्या विषयावर करणार? आपल्याकडे जे षड्रिपू आहेत ते तेच आहेत आणि ते आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहेत त्यामुळे त्यांचा बेस धरून मग या देशभरातल्या प्रेक्षकवर्गाला आवडेल असे वेगवेगळे कथेचे साचे तयार केले जातात. वर्षांनुवर्षे अशा पद्धतीने काम केल्यानंतर तो दिग्दर्शक, तो कलाकार यांच्या डोक्यात आपल्या चित्रपटांच्या यशापयशातून काही मतं ठाम झालेली असतात. त्यामुळे मग आपण हेच करूयात किंवा असंच झालं पाहिजे, हा आग्रह निर्माण होतो. मात्र, त्याला इलाज नाही. कारण, शेवटी चित्रपट सुपरहिट होणार की पडणार?, हे त्या शुक्रवारच्या दिवशीच कळतं, असं तो हसत सांगतो.
मराठी अभिनेता, लेखक असूनही विकास निवडक भूमिका सोडल्या तर मराठी चित्रपटांकडे पूर्णपणे वळला नव्हता. मराठीत काम करताना आशय महत्त्वाचा असतो. मराठी चित्रपटांना आजही कोणी ‘हिरो’ नाही. कारण, मराठी चित्रपटांमध्ये कथा, तुमचा आशय हाच कलाकारांपेक्षा महत्त्वाचा असतो. त्यामुळे जोवर आपल्याकडे सांगण्यासाठी चांगली गोष्ट नाही तोवर काम करायचं नाही.. असं ठरवलं होतं. पण, मग असंच चर्चा करताना दिग्दर्शक गणेश कदम याने ‘विटी दांडू’ चित्रपटाची कल्पना मांडली आणि मग कामाला सुरुवात झाली, असं विकासने सांगितलं. लीना देवरे निर्मित ‘विटी दांडू’ हा चित्रपट दोन काळांना जोडून घेणारा असा चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुवात आजच्या काळातील आजोबा आणि नातवापासून होते. मात्र, कथा प्रत्यक्ष घडते ती १९४७ च्या पाश्र्वभूमीवर.. चित्रपटाविषयी कल्पना देत असताना थेट कथेविषयी बोलणं विकास टाळतो. पण, ‘विटी दांडू’ या चित्रपटाच्या शीर्षकापासूनच क थेची सुरुवात होते, असं तो म्हणतो. विटी दांडू हा खेळ आहे हेच आजच्या पिढीतील मुलांना माहिती नाही. लहानपणी विटी दांडू, लगोऱ्या खेळलेली आपली ही शेवटचीच पिढी असावी बहुतेक.. या खेळाबरोबर आपल्या मातीची म्हणून एक जी मजा आहे, त्या खेळाबरोबर येणारं जे जगणं आहे ते आपल्या आठवणींबरोबर संपून जाईल की काय.. अशी भीतीही विकास व्यक्त करतो. या चित्रपटात विटी दांडू या खेळाच्या निमित्ताने इतिहासातली एका स्वातंत्र्यसैनिकाची कथा उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याने सांगितले.
‘विटी दांडू’च्या निमित्ताने अजय देवगण हे नाव प्रस्तुतकर्ता म्हणून पहिल्यांदाच मराठीत झळकणार आहे. अजय या चित्रपटाशी कसा काय जोडला गेला?, याबद्दल बोलताना मुळात या चित्रपटामुळे आपल्याला रोहितच्या चित्रपटांना वेळ देणं शक्य झालं नाही, असं त्याने सांगितलं. मी जेव्हा त्यांच्या चित्रपटांना ‘नाही’ असं सांगितलं तेव्हा तू काय करतो आहेस, अशी उलट विचारणा त्यांच्याकडून झाली. मग अजयला चित्रपटाची कथा ऐकवल्यानंतर हा चित्रपट हिंदीत करावा, असा आग्रह त्यांनी धरला. मात्र, मराठी मातीची कथा असल्याने चित्रपट मराठीतच करणार हे सांगितल्यावर अजयने प्रस्तुतकर्ता म्हणून चित्रपटाबरोबर राहायचा निर्णय घेतल्याचे विकासने सांगितले. अजयला चित्रपट इतका आवडला आहे की तो निदान हिंदीत डब तरी करावा, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. एवढेच नाही तर तो स्वत: चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुढे आला आहे, असं त्याने सांगितलं. ‘विटी दांडू’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर, गौहर खान, निशांत भावसार, शुभंकर अत्रे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 7:02 am

Web Title: shadow of bollywood vikas kadam
टॅग : Bollywood
Next Stories
1 मालिकांच्या रिमोटवर तरुणांचा कंट्रोल
2 तोकडे दिग्दर्शन
3 हास्यास्पद थरारपट
Just Now!
X