नकारात्मक प्रतिक्रिया आणि रोषाला सामोरे जावे लागल्यामुळेच संवेदनशील विषयांवर बोलताना अभिनेता शाहरुख आणि आमीर खान यांच्या मनात आता भीती निर्माण झाल्याचे स्पष्ट जाणवते, असे मत अभिनेत्री सोनम कपूरने व्यक्त केले.

‘नीरजा’ चित्रपटातील गाण्याच्या अनावरण कार्यक्रमात ती बोलत होती. शाहरुख आणि आमीर खान यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर व्यक्त केलेल्या मतावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दोघांनाही रोषाला सामोरे जावे लागले होते. हे सगळे प्रकरण घडल्यापासून सामाजिक विषयांवर बोलताना दोघांच्याही बोलण्यात आता प्रतिक्रियांची भीती किंवा ते बोलताना खबरदारी घेत असल्याचे जाणवते. प्रत्येकाला आपले म्हणणे मुक्तपणे आणि कोणतीही भीती न बाळगता मांडता येईल, असे वातावरण देशात असले पाहिजे. एखाद्याने व्यक्त केलेल्या भावनेचा दृष्टीकोन समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. आपल्या वक्तव्यावर उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे त्यानंतर आपल्या व्यक्त होण्यात भीती निर्माण होणे, हे चांगले लक्षण नसल्याचेही सोनम पुढे म्हणाली.