अक्षय आणि शाहरुख खान दोघंही बॉलिवूडचे सुपरस्टार. एक ‘अॅक्शन हिरो’ तर दुसरा ‘रोमान्सचा बादशहा’. दोन्ही ध्रुवावरची ही दोन भिन्न माणसं लवकरच एका चित्रपटात काम करताना दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. अक्षय आणि शाहरुखनं ‘दिल तो पागल है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर अक्षयच्या ‘हे बेबी’ चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. या पलिकडे या दोघांना एकत्र पाहण्याचा योग कधीही आला नाही. मात्र सारं काही जुळून आलं तर दोन्ही सुपरस्टार्सनां एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
एका सुपरहिट मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी अक्षय आणि शाहरुखच्या नावाचा विचार सुरू आहे. जर दोघांनी होकार भरला तर वीस वर्षांहून अधिक काळानंतर ही जोडी एकत्र पडद्यावर काम करताना दिसेल. काही दिवसांपूर्वी शाहरुखला अक्षयसोबत काम करणार का या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. शाहरुखनं मोठ्या मिश्किलीनं या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. माझी सेटवर यायची वेळ आणि त्याची सेटवरून निघण्याची वेळ एकच असेल. मला त्याच्यासोबत काम करायला मनापासून आवडेल पण आमच्या वेळा कधीच जमून येणार नाही. तो आणि मी एकाच वेळी सेटवर दिसणं दुर्मिळ असं शाहरुख म्हणाला होता.
अक्षय कुमार हा वेळेच्या बाबतीत अधिक दक्ष आहे. लवकर चित्रीकरण सुरू करून वेळेत ते संपवण्यासाठी तो ओळखला जातो. वेळा पाळायला अक्षयला आवडतं मात्र शाहरुखचा स्वभाव मात्र विरुद्ध आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र काम करण्याचा योग जुळून येतो का हे पाहण्यासारखं ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 12:20 pm