शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘चैन्नई एक्सप्रेस’मधील ‘लुंगी डान्स’ गाणं आठवतंय का? हे गाणं विसरणं तर शक्यच नाही. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांच्या तोंडी फक्त हेच गाणं होतं. प्रत्येक कार्यक्रमात, पार्टीत, लग्नात हे गाणं आजही आवर्जुन वाजवलं जातं. हनी सिंगचे रॅप असलेले हे गाणं पहिल्या दिवसापासून हिट ठरलं होतं. हॉलिवूडचा सुपरस्टार विन डिझेल त्याच्या ‘ट्रिपल एक्स’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता तेव्हा त्याने दीपिकासोबत हा ‘लुंगी डान्स’ केला होता.

आतापर्यंत ‘लुंगी डान्स’ या गाण्याचे अनेक व्हर्जन पाहायला मिळाली आहेत. पण सध्या सोशल मीडियावर हे गाणं एका नव्या कारणासाठी ट्रेण्ड होताना दिसत आहे. ‘लुंगी डान्स’चे भोजपूरी व्हर्जन चांगलेच गाजते आहे. पंजाबी गाण्यांनंतर सर्वात जास्त आवडीची गाणी म्हणून भोजपूरी गाणी सोशल मीडियावर पाहिली जातात हे तर साऱ्यांनाच माहित आहे.

‘हमारा भोजपूरी’ या यूट्युब चॅनलने हे गाणं शेअर केलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हे गाणं पाहिलं असून शेअरही केलं आहे. ‘चैन्नई एक्सप्रेस’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सर्वात लवकर १०० कोटींच्या घरात पोहोचणाऱ्या सिनेमांच्या यादीत या सिनेमाचे नाव आवर्जुन घेतले जाते.