करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. शाहरुख आणि गौरी विविध माध्यमातून गरजूंना मदत करत आहेत. यामध्येच त्यांनी विलगीकरणासाठी आपल्या कार्यालयाची इमारत महापालिकेला दिली आहे. शाहरुखचं हे ऑफिस विलगीकरणासाठी तयार झालं असून इमारतीच्या आत कशा प्रकारची सोय करण्यात आली आहे. याचा एक व्हिडीओ गौरी खानने शेअर केला आहे.

शाहरुखने त्याच्या कार्यालयाची चार मजली इमारत विलगीकरणासाठी दिली असून या ठिकाणी सर्व गरजेच्या वस्तूंची सोय करण्यात आली आहे. या इमारतीच्या आतील व्हिडीओ प्रथम गौरी खानच्या मीर फाऊंडेशनने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर गौरीने हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

‘या ऑफिसचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. हा क्वारंटाइन झोन असून येथे गरजेच्या सर्व वस्तूंची सोय करण्यात आली आहे. आपल्याला कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्र होऊन लढायचं आहे’, असं कॅप्शन गौरीने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, शाहरुखने त्याच्या ऑफिसची इमारत महानगरपालिकेला दिल्यामुळे त्यांनी ट्विट करत शाहरुखचे आभार मानले आहेत. शाहरुख सध्या विविध मार्गांनी शक्य होईल तितकी मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना आर्थिक मदतीसोबत जेवणंदेखील पुरवलं आहे. त्याने ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना तसंच १० हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी २ हजार जणांचं जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगार आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत केली आहे.