चीनपासून उगम पावलेल्या करोना विषाणूचा आतापर्यंत संपूर्ण जगात संसर्ग पसरला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. तर अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. याचकारणास्तव प्रत्येकालाघरात राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच करोनाला लढा देण्यासाठी वैद्यकीय सुविधांसोबत आर्थिक मदतीचीही तितकीच गरज आहे. करोनाविरोधातील लढ्याला आर्थिक बळ देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार मदत करत असताना आता जगभरातील कलाकारही पुढे आले आहेत. हे कलाकार एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी उभारणार असून तो जागतिक आरोग्य संघटनेला देणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ‘वन वर्ल्ड: टूगेदर एट होम’ हा इव्हेंट करत असून याचं थेट प्रक्षेपण(लाइव्ह स्ट्रीमिंग) होणार आहे. विशेष म्हणजे या इव्हेंटमध्ये हॉलिवूड कलाकारांसोबत अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग आहे.

‘वन वर्ल्ड: टूगेदर एट होम’  या इव्हेंटमध्ये हॉलिवूड गायिका लेडी गागा, डेव्हिड बॅकहम, जॉन लॅजेंड, अॅल्टन जॉन, प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान या कलाकारांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्फीटन कोलबर्ट ,जिमी किम्मेल आणि जिमी फॉलन हे करणार असून या शोचं १८ एप्रिल रोजी ब्रॉडकास्ट करण्यात येईल.


दरम्यान, प्रत्येक कलाकार त्यांच्या घरी राहूनच या शोमध्ये सहभागी होणार आहे. अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम डब्ल्यूएचओला देण्यात येणार आहे. यापूर्वी शाहरुखने पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. तसंच त्याचं चार मजली ऑफिसची बिल्डींगही क्वारंटाइन केंद्रासाठी दिली आहे. शाहरुखप्रमाणेच प्रियांकानेदेखील पंतप्रधान मदतनिधी, यूनिसेफ, फिडिंग अमेरिका आणि गुंज याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे.