दोन मोठे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतात तेव्हा त्याचा एकमेकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. एका आठवडय़ात तीन-चार चित्रपट प्रदर्शित होणे हे त्या चित्रपट उद्योगाच्या भरभराटीचे द्योतक मानले जाते. मात्र तरीही आपल्या चित्रपटाबरोबर दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठीच धडपड केली जाते. हिंदी चित्रपट असो वा मराठी चित्रपट.. एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणे कोणत्याही निर्मात्यासाठी किंवा कलाकारांसाठी हितावह ठरत नाही. आतापर्यंत होऊ देत की दुसरा चित्रपट प्रदर्शित, आम्हाला काही फरक पडणार नाही असं म्हणत एकाच मुहूर्तासाठी, सुट्टीतील आठवडय़ासाठी हटून बसणारे कलाकार आता एक पाऊल मागे येऊन आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी संयमी विचार करू लागले आहेत. त्याची सुरुवात अर्थातच बॉलीवूडचा किंग म्हणवल्या जाणाऱ्या शाहरूख खानने स्वत:पासून केली आहे.

आपल्या चित्रपटाला चांगला आठवडा मिळावा, यासाठी वर्षभर आधीच सुट्टीचा मुहूर्त शोधून किंवा सण शोधून त्यादृष्टीने नियोजन करूनही गेल्या काही वर्षांमध्ये एकाच वेळी मोठय़ा चित्रपटांची होणारी टक्कर निर्मात्यांना टाळता आलेली नाही. अशा प्रकारे जेव्हा दोन मोठय़ा कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार हे जाहीर झाले की मग त्यावर उपाय शोधण्याऐवजी त्याला त्या त्या कलाकाराच्या नावाप्रमाणे प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला जातो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हृतिक रोशनचा ‘काबिल’ आणि शाहरूख खानचा ‘रईस’ ठरला आहे. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांची टक्कर टाळावी यासाठी राकेश रोशन आणि शाहरूख खान यांच्यात आधी चर्चा झाली. मग त्या चर्चेचे वादात रूपांतर झाले. तरीही आपला चित्रपट पुढे सरकावा म्हणून एकाने २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला चित्रपट प्रदर्शित केला. तर दुसऱ्याने २५ जानेवारीला सकाळपासूनच आपल्या चित्रपटाचे शो लावले. एवढे करूनही खरे म्हणजे दोन्ही चित्रपटांचा वेगळा जॉनर पाहता त्यांचा प्रत्येकाचा वेगळा प्रेक्षकवर्ग असूनही दोन्ही एकाच आठवडय़ात प्रदर्शित झाल्याने चित्रपटगृहांपासून व्यवसायापर्यंत सगळ्यांचीच विभागणी झाली. परिणामी, त्याचा फटका दोन्ही चित्रपटांच्या कमाईला बसला. आपल्या या ‘रईस’ अनुभवापासून धडा घेत शाहरूखने आगामी चित्रपटासाठी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या फळीत टिकून राहायचे तर चौकटीबाहेरचा चित्रपट करणे आणि त्यावरही दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाईचे यश साध्य करणे हा त्यांच्यासाठी अलिखित संकेत जणू रूढ झाला आहे. या वर्षांच्या सुरुवातीला शाहरूखला ‘रईस’च्या माध्यमातून खूप मोठी बाजी मारता आलेली नाही. त्यामुळे इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या दुसऱ्या चित्रपटासाठी मार्के टिंगच्या बाबतीत हुशार मानल्या जाणाऱ्या शाहरूखने वेगळा विचार सुरू केला आहे. अनुष्का आणि त्याच्या या चित्रपटाबरोबर अक्षयकुमारचा बहुचर्चित ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपटच १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता.

सध्या अक्षयकुमारची लोकप्रियता आणि त्याच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहता आपल्या चित्रपटाला फटका बसू नये म्हणून शाहरूखने स्वत:च पुढाकार घेऊन आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन एक आठवडा आधी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बाहुबली २’मुळे जवळपास दोन ते तीन आठवडे कुठलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यामुळे मेच्या तिसऱ्या आठवडय़ात ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘हिंदी मीडियम’ हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना ५० ते ५५ कोटींच्या पलीकडे उडी मारता आली नाही. ‘फिलौरी’ आणि ‘अनारकली ऑफ आरा’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. त्यांनाही चांगला व्यवसाय करता आला नाही. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा यशस्वी फ्रँ चाईझी असूनही तोही आपटला आणि ‘मेरी प्यारी बिंदू’लाही करिश्मा साधता आला नाही. या वर्षांच्या सुरुवातीपासूनच चांगल्या चित्रपटांच्या एकत्रित प्रदर्शनामुळे एकूणच व्यवसायावर परिणाम झालेला असतानाही आगामी चित्रपटांच्या बाबतीतही हा कांटे की टक्करचा सिलसिला सुरूच राहणार आहे. १६ जूनला रितेश देशमुखचा ‘बँकचोर’ आणि परेश रावलचा ‘अतिथी इन लंडन’ प्रदर्शित होणार आहेत. सैफ अली खानच्या महत्त्वाकांक्षी ‘शेफ’ या चित्रपटाबरोबर श्रद्धा कपूरचा हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आयुषमान खुराणा-क्रिती सनन जोडीचा ‘बरेली की बर्फी’ आणि टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकेल’, आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यावर्षीचे केवळ बिग बजेट नाही तर ज्याची सर्वात जास्त उत्सुकता आहे तो सलमान खान-कतरिना कैफ जोडीचा ‘टायगर जिंदा है’ आणि संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत.

मात्र शाहरूखने जसा ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या बाबतीत निर्णय घेतला आहे तसाच निर्णय दिग्दर्शक राजकुमार हिरानीही घेणार आहेत. अली जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा फक्त बॅनरने मोठा चित्रपट नाही, सलमानचा चित्रपट म्हणूनही तो मोठा आहे, शिवाय तो सिक्वल असल्याने त्याचा फटका रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाला बसू नये म्हणून हिरानींनी आपला चित्रपट पुढे ढकलला आहे. तीच गोष्ट रणबीरच्या ‘जग्गा जासूस’च्या बाबतीतही घडली. ‘जग्गा जासूस’बरोबर श्रीदेवीचा ‘मॉम’ आणि सैफ अली खानचा ‘शेफ’ प्रदर्शित होणार होता. पण त्या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपापल्या तारखा बदलल्याने ‘जग्गा जासूस’ला पूर्ण आठवडा मिळणार आहे. यावर गमतीने का होईना पण रणबीरने आपण दोन्ही निर्मात्यांना ‘धन्यवाद’चे एक पत्र पाठवणार असल्याची भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्याचे हे गमतीने केलेले विधानही सध्या आपले चित्रपट यशस्वी ठरणे हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगून जाते. मराठीतही ‘मुरांबा’ आणि ‘एफयू’ या दोन्ही चित्रपटांचे एकाच दिवशी होणारे प्रदर्शन टाळता येणारे नव्हते म्हणून दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन प्रेक्षकांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी मोठय़ा कलाकारांसाठी आपल्या चित्रपटांची ही ‘कांटे की टक्कर’ प्रतिष्ठेची बाब ठरली होती. आता मात्र त्यांच्यासाठी तो काळजीचा विषय झाला आहे..