एकीकडे अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवरील फॉलोवर्स कमी झाले म्हणून ते ट्विटरवाल्यांवर नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे शाहरुखच्या फॉलोवर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. बॉलिवूडच्या किंग खानचे ट्विटरवर ३.३ कोटी फॉलोवर्स झाले आहेत. शाहरुख त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या संख्येत वाढ झाली की चाहत्यांना नेहमीच वेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत असतो. आता ३.३ कोटी फॉलोवर्स झाले म्हटल्यावर यासाठीचे एक वेगळेच सेलिब्रेशन असणार ना…

बॉलिवूडचा बादशहा म्हटल्यावर त्याचे सेलिब्रेशनही हटके असणार यात काही शंका नाही. त्याने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चक्क स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पाण्यात उडी मारताना त्याने विशेष पेहराव केला होता. त्याने महागडा सूट घातला होता आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला होता. शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘मी कधीच नियोजन करुन काम करत नाही. पण आज मात्र मी ठरवून तुमच्यासाठी एक गोष्ट करणार आहे. मी जे काही करतोय त्यात चूक बरोबर पाहू नका. त्यामागच्या माझ्या भावना पहा.’ बॉलिवूडच्या बादशहाने ट्विटर फॉलोवर्सच्या शर्यतीत पहिला क्रमांक सोडला नाही. त्याचे ३ कोटी ३२ लाख फॉलोवर्स आहेत.

किंग खानच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो ‘झिरो’ या सिनेमात दिसणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुखने या सिनेमाशी निगडीत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तो रिक्षा चालवताना दिसतो तर त्याच्या मागे कतरिना आणि अनुष्का बसल्या आहेत.