ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांचा सध्या जोरदार ट्रेण्ड आहे. याचाच विचार करत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे आणि या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी तो सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी मुकेश अंबानी जवळपास १००० कोटींचा निर्मिती खर्च उचलणार असल्याचं म्हटलं जात असून परफेक्शनिस्ट आमिर यात कृष्णाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अभिनेता शाहरुख खानने एका मुलाखतीत आमीर खान हा महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे.

शाहरुखने ही माहिती ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. महाभारत चित्रपटात कोणती भूमिका साकारायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘कृष्णाची भूमिका करायला आवडेल, पण ती भूमिका आमिर साकारणार आहे. त्यामुळे मी कृष्ण साकारू शकत नाही’, असे सांगितले. आमिरचा ‘महाभारत’ हा चित्रपट सात भागांमध्ये करण्याचा मानस होता. मात्र, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार , आता चित्रपटाऐवजी सात भागांची वेब-सीरिज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. ‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

महाभारतावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी जवळपास १०- १५ वर्षांचा काळ जाऊ शकते, असंही त्याने बऱ्याच दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यामुळे आता महाभारतावर आधारित साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केव्हा होते हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काळात हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही ‘महाभारत’ या महाकाव्याचा आधार घेत महत्त्वाकांक्षी चित्रपट साकारण्यात येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरेल यात शंका नाही.