दमदार अभिनयासोबतच बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान त्याच्या विनोदबुद्धीसाठीही चांगलाच प्रसिद्ध आहे. जितकं प्रेम चाहते त्याच्यावर आणि त्याच्या चित्रपटांवर करतात, तितकंच प्रेम शाहरुख त्यांच्यावर करतो. सोशल मीडियाद्वारे तो सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतंच त्याने ट्विटरवर चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. सध्या सर्वांनाच पडणारा प्रश्न एका युजरने शाहरुखला विचारला असता त्यावर बॉलिवूडच्या ‘बादशहा’ने अत्यंत मजेशीर उत्तर दिलं.

‘आपने बॉलिवूडसे किनारा क्यूं कर लिया? मिस यू सो मच ‘ (तुम्ही बॉलिवूडपासून लांब का गेलात, तुमची फार आठवण येते), असा प्रश्न एकाने शाहरुखला ट्विटरवर विचारला. त्यावर शाहरुखने त्याला उत्तर दिले, ‘मी स्वत: बॉलिवूड आहे’. तर दुसऱ्या युजरने शाहरुखला गेल्या काही महिन्यांत विविध विद्यापीठांकडून मिळालेल्या डॉक्टरेटच्या पदवींसाठी शुभेच्छा देत ‘डॉन ३’च्या चित्रपटाची उत्सुकता असल्याचं सांगितलं. त्यावरही मस्करी करत शाहरुख म्हणाला, ”धन्यवाद! कदाचित मी आता ‘डॉक ५’ हा चित्रपट करायला हवा.”

शाहरुख गेल्या वर्षी ‘झिरो’ या चित्रपटात झळकला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. यामध्ये अनुष्का शर्मा व कतरिना कैफची त्याच्यासोबत मुख्य भूमिका होती. ‘झिरो’च्या आधी ‘फॅन’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ हे दोन्ही शाहरुखचे चित्रपट फ्लॉप ठरले.