बॉलिवूडमध्ये शाहरुख खानची ताकद तब्बल वयाच्या पन्नाशीनंतरही दिसून येते. तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडच्या पडद्यावर वेगवेगळ्या अभिनयाने शाहरुख अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताइत बनला आहे. खानमंडळीचा दबदबा असणाऱ्या बॉलिवूडमध्ये शाहरुखने सर्व वयोगटातील प्रेक्षकांवर छाप टाकली असून, अधिक महिलांवर जादू केली आहे. त्यामुळेच त्याच्या फॅन फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात महिलावर्ग असल्याचे दिसून येते. त्याचे रोमॅन्टिक चित्रपट आणि हटके अंदाज यामुळे अनेक महिलांच्या मनात शाहरुखने घर केले आहे. खुद्द शाहरुख देखील महिलांसोबत अधिक मुक्तपणे वावरत असल्याचे मानतो. पण याच महिला प्रेमामुळे त्याला कधीकधी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. याची दक्षता घेण्यासाठीही तो सध्या महिलांचाच आधार घेतो आहे.

बॉलिवूड बादशहा शाहरुख खानने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’च्या व्यासपीठावरुन चाहत्यांसोबतचे अनुभव आणि कुटुंबियांसोबतचे काही किस्से सांगितले. यावेळी त्याने महिला बॉडीगार्ड ठेवण्याच्या रहस्याचा उलगडा केला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सुंदरींमुळे अनेकदा वेदनादायी अनुभव आले आहेत. त्यामुळेच त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी महिला बॉडीगार्डसोबत फिरतो, असे शाहरुखने सांगितले. माझ्या फॅन फॉलोअर्समध्ये अनेक सुंदर महिला आहेत. मी ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी त्या माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात. या महिलांची नखे खूपच सुंदर असतात, पण ती खूप वेदनाही देतात. बऱ्याचदा मला चाहत्यांच्या नखांनी घायाळ केले आहे. त्यांच्या नखांनी झालेल्या जखमेनंतर ज्यावेळी मी घरी जातो तेव्हा पत्नी आणि मुलांना समजावणे फारच कठीण जाते.

आपल्या सुंदर फॅन फॉलोअर्सच्या नखांना घाबरुन महिला बॉडीगार्ड ठेवणाऱ्या शाहरुखने चाहत्यांना आकर्षित करण्याचे रहस्यदेखील यावेळी सांगितले. तुम्ही जेव्हा घराबाहेर पडता तेव्हा तुमच्यातून सुगंध दरवळायला हवा, दात स्वच्छ असायला हवेत, केस रचनाही सॉफ्ट हवी, यामुळे लोक तुम्हाला फॉलो करतील, असे तो म्हणाला. बॉलिवडमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा शाहरुख खान पार्टीमध्ये नेहमीच चेहऱ्यावर राग घेऊन जाताना दिसतो. पार्टीमधील चेहऱ्यावरील रागाविषयी बोलताना शाहरुख म्हणाला की, मी ज्यावेळी पार्टीमध्ये जातो त्यावेळी माझ्या गाडीच्याभोवती अनेकदा चाहते गर्दी करत असतात. या गर्दीमध्ये कुणाला दुखापत होऊ नये, यासाठी मी त्यांना गाडीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झालेले असते.