भारतात मोठ्या प्रमाणावर असहिष्णुता अस्तित्वात असल्याचे मत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने त्याच्या ५० व्या वाढदिवशी व्यक्त केले होते. त्यानंतर शाहरुखवर टीकाही करण्यात आली होती. सोमवारी आमिरने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर ‘भारतात टोकाची असहिष्णुता’ असल्याचे आपण बोललोच नाही, असे शाहरुख काल एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला.
आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे. ‘मिड-डे’ या वृत्तपत्राशी बोलताना शाहरुख म्हणाला की, मी काहीतरी बोललो आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, आणि त्यामुळे मी संकटात पडलो. हे पिडादायक होते. मी कधीचं बोललो नाही की भारत असहिष्णु आहे. उलट मला याबाबत विचारले असता याबद्दल बोलण्यात मी काहीचं रुची दाखविली नाही. तरीही मला असहिष्णुतेबाबत सतत प्रश्न विचारले गेले, त्यावर तरुणांनी धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी देश बनवण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे, इतकीच मी प्रतिक्रिया दिली होती.
लोकांना ज्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. त्यावर ते ठेवतात. माझ्या शब्दांची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी एखाद्या राजकीय धोरणाला संयुक्तिक ठरेल किंवा नाही. पण जे दाखवण्यात आले तसा माझ्या बोलण्याचा अर्थच नव्हता. यामुळे मी खूप निराश झालो आहे. मी एक अभिनेता असून, चित्रपट करतो आणि हे माझ्यासाठी पुरेसे आहे. मी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे काही लोकांना प्रेरणा मिळते. आणि हेच काम मी करावे, असे मला वाटते, असेही शाहरुख म्हणाला. शाहरुखच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी तो ‘पाकिस्तानी एजन्ट’ असल्याची टीका केली होती.