बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान याच्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बऱ्याच चर्चा आहेत. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी त्याने आवाजसुद्धा दिला आहे. या चित्रपटामध्ये त्याने ‘सिम्बा’ या पात्राला आवाज दिला होता. त्यानंतर आता आर्यन चित्रपटातून कधी डेब्यु करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे चित्रपट दिग्दर्शक करण जोहर त्याला लॉन्च करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आर्यन कधीच अभिनय करु शकणार नाही असं म्हणतं शाहरुखने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“आर्यनला दिग्दर्शक व्हायची इच्छा आहे. त्याला अभिनेता व्हायचं नाही आणि त्याला अभिनयाची आवडही नाही. त्यामुळे तो कधीच अभिनेता व्हायचा विचार करणार नाही आणि त्याला ते जमणारही नाही”, असं शाहरुखने सांगितलं.

पुढे तो म्हणाला, “अनेकांचा समज असतो की कलाकाराचा मुलगा त्याच्याप्रमाणेच अभिनेता होईल पण तसं नसतं. आर्यन दिसायला चांगला आहे, त्याची उंचीही मस्त आहे. मात्र अभिनय करण्यासाठीचे गुण त्याच्यात नाही. हे त्यालादेखील चांगल्याप्रकारे माहित आहे. उलटपक्षी तो चांगला लेखक आहे”. दरम्यान, गेल्या वर्षी शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर तो एकाही चित्रपटामध्ये झळकला नाही. सध्या तो त्याचा जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवत आहे.