बॉलीवूडचा कोणताही चित्रपट हा चित्रपटाच्या गोष्टीपेक्षा त्यामध्ये कोण काम करतंय यावर अधिक चालतो. त्यामुळेच शाहरुख खानचा एखादा नवा चित्रपट येतो तेव्हा तो चित्रपट काय आहे यापेक्षा शाहरुख खान काय करतोय याचंच कुतूहल अधिक असतं. या आठवडय़ात आलेल्या ‘रईस’च्या निमित्ताने शाहरुखबरोबर झालेल्या गप्पांमध्ये नेमके हेच जाणवते. शाहरुखला पूर्ण माहीत असते की लोक चित्रपट पाहायला का येतात. आणि गेली २५ वर्षे बॉलीवूडची ही नस नेमकी पकडल्यामुळेच तो आजवर इथपर्यंत आला आहे, हेच त्यातून प्रकर्षांने जाणवत राहते.

फोटो गॅलरी: भारतीय जवानांना मराठी कलाकारांचा सलाम… 

खरं तर शाहरुखने आजवर कैक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. अगदी खलनायकी बाजापासून ते विनोदी पात्रापर्यंत. पण तो नायक असतो आणि त्याच्या लोकप्रियतेतून ते अगदी ठामपणे दिसतं. ‘रईस’ हा खलनायकी वृत्तीच्या पात्रावर बेतलेला चित्रपट. किंबहुना हा खलनायकच चित्रपटाचा नायक आहे. गुजरातमधलं अवैध व्यवसाय करणारं हे पात्र. वयाच्या तीन टप्प्यांवरील प्रवास या चित्रपटातून शाहरुखने साकारला आहे. या अवैध व्यवसायाचे हे उदात्तीकरण आहे की काय असे वाटायला लावणारी त्याची ही भूमिका. पण त्यावर त्याचं स्पष्टीकरण तयार असतं. जीवनातील वेगवेगळे रंग चित्रपटातून दाखवले जातात. हा त्यापैकीच एक प्रकार आहे. चित्रपटातून गोष्ट सांगण्याचं स्वातंत्र्य हा मुद्दा त्यामागे असल्याचं त्याचं म्हणणं असतं.

शाहरुखने साकारलेल्या खलनायकीकडे झुकणाऱ्या भूमिकाच अधिक चांगल्या लक्षात राहतात. तो नायक आहेच, पण त्याहीपेक्षा काहीशी ग्रे शेड असणाऱ्या भूमिकांतून तो अधिक खुलून दिसतो. ‘रईस’ या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक महिने होती. मध्यंतरी त्याचा अपघात आणि इतर अनेक कारणांमुळे हा चित्रपट तसा लांबलाच म्हणावा लागेल. पण ‘रईस’ची चर्चा सुरू झाली त्याला आणखी एक कारण होते. ते म्हणजे चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार. शाहरुखची पडद्यावरील नायिका माहिरा खान. अर्थातच या मुद्दय़ावर चर्चा होणं स्वाभाविक होतं. हल्ली समांतर सेन्सॉॅरशिप अधिक वाटते का याचे उत्तर तो ज्या सफाईने देतो ते म्हणजे एका कसलेल्या कलाकारापेक्षा मुरलेला चित्रपट व्यावसायिक म्हणावा लागेल. शाहरुख सांगतो की, त्याच्या चित्रपटांकडून लोकांना अपेक्षा असतात. लोक तो आपणहून पाहायला येतात. आणि त्यांना चित्रपट आवडला नाही तर तुम्ही पैसे परत मागू शकत नाही की इतर वस्तूंसारखे बदलून घेऊ शकत नाही. ‘त्यामुळे माझा चित्रपट पाहायला येणाऱ्यांचे पूर्ण समाधान करणं माझं काम आहे. मी तुमची करमणूक करण्यासाठी आहे, जे आवडणार नाही ते काढून टाकायची माझी तयारी आहे.’ शाहरुखचे हे उत्तर म्हणजे चित्रपटाच्या बाबतीत व्यवसायाची आणि प्रेक्षकांची नेमकी नस पकडणारे म्हणावे लागेल. मध्यंतरी ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमाच्या निमित्ताने पाकिस्तानी कलाकारांबाबत निर्माण झालेला गदारोळ, मनसेची भूमिका, त्यानंतर सैनिक कल्याण निधीला मदत असा बराच गोंधळ झाला होता. हे सर्व टप्पे न घेता ‘रईस’ प्रदर्शित झाला यामागे शाहरुख एक चित्रपट व्यावसायिक म्हणून कसा आहे हेच यातून जाणवत राहते.

शाहरुखने स्वत:च्या भूमिकांबाबत जसे अनेक प्रयोग केले आहेत, तसेच त्याच्याबरोबरच्या कलाकारांबाबतदेखील. याचसंदर्भात त्याला छेडलं असता तो सहकलाकारांबाबत खूपच ॠणी असल्याचं जाणवतं. तो सांगतो, ‘नवनवीन लोकांसोबत काम करताना कायमच नवीन शिकायला मिळते. माझे मत त्यांना कळते, त्यांची मतं मला समजतात आणि त्यातूनच मला नव्याने काही तरी करता येते. महत्त्वाचे म्हणजे सहकलाकार फारसे प्रसिद्ध नसतात तेव्हा त्याचा खूपच फायदा होतो.’ यासाठी तो ‘स्वदेस’ आणि ‘चक दे’ या सिनेमांची उदाहरणं देतो. या दोन्ही चित्रपटांसाठी नेहमीच गाजलेले कलाकार घेतले असते तर कदाचित तो सिनेमा नेहमीसारखाच अगदी टिपिकल वाटला असता, पण सहकलाकारांच्या नावीन्यामुळेच मला काही वेगळा अभिनय करता आला, हे तो प्रामाणिकपणे कबूल करतो.
प्रदर्शन लांबल्यामुळे ‘रईस’ आणि ‘काबिल’ नेमके एकाच आठवडय़ात प्रदर्शित होत आहेत. याबाबत तो सांगतो की ‘दोन सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे व्यवसाय विभागला जाईल. पण एकंदरीतच दोन-चार दिवसांच्या सुट्टीमुळे हा परिणाम कमी होतानाही दिसेल. भविष्यात थिएटर्सची संख्या वाढल्यानंतर मात्र एका आठवडय़ात दोन-चार चित्रपट आले तरी त्याचा विशेष परिणाम जाणवणार नाही.’

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान ‘रईस’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘डर’, ‘अंजाम’, ‘बाजीगर’, ‘डुप्लिकेट’, ‘डॉन’ अशा काही सिनेमांमधून किंग खानने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झालं आहे. रोमँटिक हिरोची खलनायकी बाजू या सिनेमांमुळे प्रेक्षकांसमोर आली होती. त्याच्या अशा भूमिकांचं त्या-त्या वेळी कौतुकही झालं होतं. या सिनेमांमधून साकारलेल्या खलनायकाची आठवण पुन्हा एकदा ‘रईस’ हा सिनेमा करून देईल, अशी अपेक्षा आहे.
सौजन्य – लोकप्रभा