१० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि सौंदर्य, अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आज चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी ती अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. आपल्या मुलीने अशी अतुलनीय कामगिरी करावी ही प्रत्येक पालकांसाठी अभिमानाची गोष्ट असतेच. दीपिकाची आई उजाला पदुकोण यांनी तिला एक पत्र लिहिलं आणि हे पत्र वाचलंय खुद्द बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने.

एका कार्यक्रमात शाहरुखने दीपिकाच्या आईचं पत्र तिच्यासमोर वाचून दाखवलं. या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, ‘दीपिकाने अभिनय क्षेत्रात जे यश संपादन केलं, त्याचा मला अभिमान आहे. लहानपणी ती टॉमबॉय होती. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात या स्वभावाची झलक दिसून येते. बऱ्याच गोष्टींचा त्याग तिनेही केला आहे. घर आणि काम या दोन्ही गोष्टी तिने चांगल्या पद्धतीने हाताळल्या.’ शाहरुख खान हे पत्र वाचत होता तेव्हा दीपिकाचे डोळे पाणावले. पत्र वाचल्यानंतर किंग खानसुद्धा काहीसा भावूक झाला.

नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आईविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. ‘कुटुंबाला आधार देण्याचं काम आई करते. माझे वडील सेलिब्रिटी आहेत आणि बहिणीने गोल्फमध्ये करिअर केलं, पण माझी आई कधीच प्रसिद्धीच्या झोतात नव्हती. तिने आम्हा सर्वांना आधार दिला. माझ्या कुटुंबात तीच खरी हिरो आहे,’ असं तिने म्हटलं होतं.