बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खानला आतापर्यंत अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र तरीदेखील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्यामुळे त्याने खंत व्यक्त केली आहे.

शनिवारी झालेल्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बोलत असताना शाहरुखने त्याची खंत व्यक्त केली आहे. या महोत्सवामध्ये शाहरुखच्या आगामी   ‘झीरो’ चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला. तसंच त्याला केआईएफएफमध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते क्रिस्टल ट्रॉफीदेखील देण्यात आली. यावेळी शाहरुखने ममता बॅनर्जी यांचे आभार मानत आतापर्यंत एकही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

‘आतापर्यंत मी ७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून माझे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. मात्र तरीसुद्धा मला अजूनपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. मी कायमच माझ्या कामावर प्रेम केलं आहे आणि मनापासून माझं काम करत आलो आहे. तरीदेखील मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. ही खंत माझ्या मनात कायम राहिली आहे, असं शाहरुख म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, आज ममताजी यांनी मला क्रिस्टल ट्रॉफी देऊन सन्मानित केलं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो.

दरम्यान, शाहरुखला आतापर्यंत तब्बल ५२५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र केवळ राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची खंत त्याला जाणवत असल्याचं त्याने या पुरस्कार सोहळ्यावेळी सांगितलं.