‘किंग ऑफ रोमान्स’, ‘बादशाह’, ‘किंग ऑफ बॉलिवूड’, ‘किंग खान’ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानला या इंडस्ट्रीत जवळपास २६ वर्ष पूर्ण झाली. २६ वर्षांच्या या करिअरमध्ये शाहरुखने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. पण ‘झिरो’ चित्रपटानंतर किंग खानची जादू ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर त्याने एकही नवा चित्रपट साईन केला नसून या मागचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे.

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. या चित्रपटानंतर शाहरुख कोणत्याच चित्रपटामध्ये झळकला नसून त्याच्याकडे कोणताही आगामी प्रोजेक्ट नसल्याचंही पाहायला मिळत आहे. या संदर्भात त्याने नुकताच खुलासा केला असून सध्या त्याच्याकडे काम का नाही या मागचं कारण उलगडलं आहे.

“अनेकदा असं होतं की आपण एखादा चित्रपट करत असताना तुमच्याकडे आगामी चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. त्यामुळे एक प्रोजेक्ट संपायच्या आता तुम्ही नव्या प्रोजेक्टला सुरुवात केली असते. मात्र माझं तसं झालं नाही. माझ्याकडे नवीन प्रोजेक्ट नाही”, असं शाहरुख म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, “सध्या मी माझ्या जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत व्यतीत करत आहे. मला असं वाटतंय की सध्या मी माझ्या वेळ पुस्तके वाचनात घालवावा. त्यासोबतच माझी मुले सध्या कॉलेज जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा मी वेळ दिला पाहिजे”.

दरम्यान, शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅपी न्यू इअर’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा आकडा पार केला होता. पण त्यानंतर त्याच्या चित्रपटांना काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’ या चित्रपटांची कमाई जेमतेम झाली. त्यामुळे किंग खान शाहरूखची बॉक्स ऑफिसवरील जादू ओसरली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.