बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला ज्याप्रमाणे अभिनयाचा बादशहा म्हणून ओळखले जाते, अगदी तसेच त्याला एक आदर्श पिता म्हणूनही ओळखले जाते. आपल्या चित्रीकरणात व्यग्र असताना देखील त्याने आपल्या मुलांवर असणारे प्रेम सिद्ध केले आहे. आपल्या मुलांना नेहमीच आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शाहरुखने व्यसनमुक्तीचा निर्धार केला आहे. आपल्या तीन मुलांसोबत अधिक वेळ घालविता यावा, यासाठी तो सध्या सिगारेट आणि दारुच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

वयाच्या पन्नासीनंतर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू टिकवून ठेवणाऱ्या शाहरुखने ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्हमध्ये व्यसनापासून मुक्त होण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमामध्ये शाहरुख म्हणाला की,  वयाच्या पन्नासीमध्ये ४ वर्षाचा मुलगा असणे खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला जगण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. मला २० ते २५ वर्षे माझ्या चार वर्षाच्या मुलासोबत घालवायची आहेत. त्यासाठी मी  निरोगी आरोग्यावर भर देत आहे. मुलांच्या आयुष्यातील हस्तक्षेपाबद्दल शाहरुख म्हणाला की, मला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. शाहरुखच्या १५ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळीपासूनच शाहरुख सिगारेट आणि दारु या व्यसनाच्या आहारी गेला. ही आठवण सांगत शाहरुख म्हणाला की, मी गेल्यानंतर माझ्या मुलांनी व्यसनाच्या आहारी जावे, असे वाटत नाही.

यापूर्वीच शाहरुख खानने शुक्रवारी नानावटी रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा) अॅण्ड बर्थिंग सेंटरचे अनावरण केले. यावेळी शाहरुखने प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता. शाहरुखचा सर्वात लहान मुलगा अब्राम याचा जन्म झाला तेव्हा त्याचा जीव धोक्यात होता असे सांगत नानावटीतील डॉक्टरांनी अब्रामचे प्राण वाचवले, असे शाहरुख म्हणाला.  सगळ्यांनाच माहितीये की, शाहरुखचे त्याच्या मुलांवर फार प्रेम आहे. सध्या सर्वात जास्त लाड त्याचा लहान मुलगा अब्रामचेच होत आहेत.  शाहरुख त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याचे आणि अब्रामचे अनेक फोटो शेअर करत असतो.