चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. त्यातच सध्या अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान यांची मुलं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे आणि विविध बॉलिवूड पार्टींमध्ये हजेरी लावत असल्यामुळे चर्चेत आहेत. पण सेलिब्रिटी मुलांमध्ये सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे किंग खान आणि त्याच्या मुलांची. गेल्या काही दिवसांमध्ये सुहाना खान आणि आर्यन खान यांच्याविषयीच्या विविध चर्चा बॉलिवूड वर्तुळामध्ये रंगत होत्या.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखने त्याच्या मुलांसोबतच्या नात्यावरुन पडदा उचलला आहे. शाहरुख आणि त्याच्या मुलांमध्ये वडिल- मुलांच्या नात्यापेक्षा एक प्रकारचे मित्रत्वाचे नाते आहे. पण याच मित्रत्वाच्या नात्यामध्ये शाहरुखला त्याच्या मुलांसोबत लैंगिक शिक्षणाविषयी बोलण्यात, चर्चा करण्यात काहीसा संकोचलेपणा वाटतो. ही शाहरुखमध्ये एक वडिल म्हणून असलेली कमतरता नाही, हे सुद्धा तो तितक्याच स्पष्टपणे नमूदही करतो.

शाहरुखच्या मते लैंगिक शिक्षणाविषयी त्याची मुले त्याच्यापेक्षा जास्त जाणतात. याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘मी खूप लाजरा आहे. त्यामुळे मी माझ्या मुलांना लैंगिक शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे मी या विषयाची वाच्यताही करत नाही’. यापुढे सांगताना शाहरुख म्हणाला की, ‘कधीकधी त्यांच्यासोबत (मुलांसोबत) एखादा चित्रपट पाहताना मला असं वाटतं की या विषयाबद्दल त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे’. शाहरुखच्या या बोलण्यावरुन त्याचे आणि त्याच्या मुलांमध्ये असणारे नाते स्पष्ट होत आहे. अभिनेता म्हणून किंग खान त्याच्या कामाप्रती जितका तत्पर आहे तितकाच तो एक पिता म्हणूनही त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.

पाहा: छायाचित्रकारांपासून अशा प्रकारे शाहरुखने केला अब्रामचा बचाव..

असा हा किंग खान लवकरच त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता कुणाल कपूर झळकणार आहेत. गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचे टिझर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.