आयपीएलसाठी कुटुंबीयांसोबत दुबईत गेलेला अभिनेता शाहरुख खान मुंबईत परतला आहे. मंगळवारी किंग खानने गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात फेरफटका मारला. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला कोणी ओळखूच शकलं नाही.

पांढरा टी-शर्ट, काळ्या रंगाचा ट्राऊझर आणि त्यावर राखाडी रंगाची हुडी त्याने परिधान केली होती. मास्क आणि सनग्लासेस लावल्याने तो शाहरुखच आहे हे सहजासहजी लक्षात येणार नव्हतं. आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो तिकडे आला होता असं समजतंय.

शाहरुखने नुकताच त्याचा ५५वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तो दुबईत होता आणि दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर त्याच्या वाढदिवसानिमित्त खास रोषणाई करण्यात आली होती.

आणखी वाचा : ‘फालतू हिरोईन’ म्हणणाऱ्याला तापसीचं सडेतोड उत्तर

‘पठाण’ या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण भूमिका साकारणार आहे. या दोघांनी आधी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुखने त्याचा लूक बदलला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’नंतर शाहरुखचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.