‘डिअर जिंदगी’ आणि ‘रईस’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आता भारतीय वायूदलावर चित्रपट काढणार आहे. त्याची रेड चिलीज एण्टरटेन्मेन्ट ही निर्मिती संस्था भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन खुकरी’वर चित्रपट काढणार असल्याचे कळते.

‘मुंबई मिरर’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, रेड चिलीजचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महागडा प्रोजेक्ट असणार आहे. अजुर एण्टरटेन्मेन्ट आणि रेड चिलीज संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करतील. या चित्रपटातून भारतीय भूदल आणि वायूसेनेच्या साहसाला सलाम करण्यात येणार आहे. दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांची नाव ठरली असून, याचे चित्रीकरण आफ्रिकेत करण्यात येईल. चित्रपटात शाहरुख खान सैनिकाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जातेय. यावर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.

‘ऑपरेशन खुकरी’ काय आहे?
भारतीय भूदल आणि वायू सेनेने २००० साली पश्चिम आफ्रिकेच्या सिएरा लियोनमधील जंगलांमध्ये ‘ऑपरेशन खुकरी’ ला सुरुवात केली होती. ‘रिव्होल्युशनरी युनायटेड फ्रंट’ या बंडखोर गटाशी सामना करण्याकरिता संयुक्त राष्ट्राद्वारे २२३ भारतीय शांतीदूत पाठवण्यात आले होते. त्यानंतर या २२३ शांतीदूतांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी नवी दिल्लीतून वायू सेनेच्या १२० अधिकाऱ्यांना एअरलिफ्टमधून पाठवण्यात आले. या १२० अधिकाऱ्यांच्या चमूचे नेतृत्व हरिंदर सूद यांनी केले होते. या ऑपरेशनमध्ये वायू सेनेच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले होते.

सध्या बॉलिवूडमध्ये युद्धांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्याचा ट्रेंड सुरु असल्याचे दिसते. अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’, राणा डग्गुबतीचा ‘गाझी अटॅक’ इतकेच नव्हे तर सलमान खानचा आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपट देखील युद्धजन्य परिस्थितीवर आधारित आहे.